मुंबई :
घायाळ पाखरांना पंख दिले तु
मुक्या वेदनांना शब्द दिले तू...!
या शाहिरांच्या गाण्याप्रमाणे ऊन, थंडीची तमा न बाळगता महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर 2025 रोजी अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायींचा महासागर चैत्यभूमीवर उसळला होता. दादर रेल्वे स्थानकापासून ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमला होता.
शनिवारी सकाळी 8 वा. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह अनेक मंत्री, राज्यमंत्री, आयुक्त आणि प्रशासनातील विविध अधिकारी यांनी महामानव यांना अभिवादन केले. रांगेत कुणी घुसू नये, यासाठी प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि समता सैनिक दल यांचा कडेकोट बंदोबस्त होता.
24 तासांचा भव्य ‘गिगा मेडिकल कॅम्प’
शिवाजी पार्कमध्ये मेगा हेल्थ मिशन अंतर्गत 24 तासांचा भव्य ‘गिगा मेडिकल कॅम्प’घेण्यात आला. शुक्रवारपासून सुरू झालेल्या शिबिरात 1500 अनुयायांची तपासणी करण्यात आली. केबी हाजी बच्चुअली नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.डोळ्यांच्या आजारांपासून बचावासाठी हा विशेष उपक्रम राबवला आहे.उपक्रमासाठी डॉक्टर, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि सहायकांसह 20 सदस्यांची टीम सतत पाच शिफ्टमध्ये काम करत आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी 108 रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्या आहेत.
डिजिटल आणि विशेष सुविधा यंत्रणा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात यंदा गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केलेल्या ‘स्मार्ट क्राउड मॅनेजमेंट सिस्टम’मुळे भाविकांच्या हालचालींचे रिअल-टाइम निरीक्षण शक्य झाले आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने गर्दी , वाहतुकीची स्थिती आणि आपत्कालीन मार्ग सतत मॉनिटर होत आहेत.