Lalbaugcha Raja Mobile Theft Pudhari
मुंबई

Lalbaugcha Raja Mobile Theft: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; १९२ मोबाईल लंपास, १८ जण ताब्यात

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची टोळी सक्रिय; सीसीटीव्ही आणि तक्रारींच्या आधारे पोलिसांचा तपास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील अलोट गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांना लक्ष्य केले. गर्दीत हातचलाखी करून तब्बल १९२ मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत १८ जणांना ताब्यात घेतले.

गर्दीत घुसून मोबाईलवर डल्ला

विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीच्या ठिकाणी चोरटे भाविकांमध्ये मिसळले. धक्काबुक्की आणि गर्दीचा फायदा घेत त्यांनी भाविकांच्या खिशातील तसेच बॅगमधील मोबाईल लंपास केले. मोबाईल चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी चोरट्यांची धरपकड केली. चोरीला गेलेल्या मोबाईलची संख्या तब्बल १९२ असल्याचे समोर आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात चोरट्यांचा वावर

लालबाग परिसरात गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या गर्दीला चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि काळाचौकी महागणपती परिसरात मोबाईल, दागिने आणि अन्य वस्तूंच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी ११ गुन्हे दाखल केले होते.

विसर्जन मिरवणुकीच्या काळात मात्र गर्दीचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतला गेल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तक्रारी आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

अटक केलेल्या आरोपींच्या माध्यमातून या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीचे मोबाईल कुठे विकले किंवा लपवले, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT