मुंबई : तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यावर यावर्षी समुद्राच्या भरतीचा अडथळा आल्याने तब्बल 34 तासांनंतर गणेशमूर्तीचे गिरगावच्या समुद्रात विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीदिवशी स. 11 वाजल्यानंतर विसर्जनासाठी मंडपातून निघालेला लालबागचा राजा दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता गिरगाव चौपाटीवर आला. मात्र, समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने लालबागच्या राजासमोर विघ्न निर्माण केले आणि विसर्जन रखडले. शेवटी रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी विसर्जन पार पडले. लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
गुजरातहून आणलेला अत्याधुनिक तराफा आणि मंडळाच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे दरवर्षी विसर्जन सोहळ्यात असलेल्या वाडेकर कोळी बांधवांसह भाविकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, मंडळाने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण सोशल मीडियावरून मंडळावर टीकेची झोड उठली आहे.
शनिवारी दिवसभर आणि रात्रीच्या दणदणीत मिरवणुकीनंतर लालबागचा राजा सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचला. हजारो भक्तांच्या गर्दीत, जयघोषांच्या गजरात, ढोल-ताशांच्या नादात बाप्पा किनार्यावर आले. परंतु त्यानंतर समुद्राला मोठी भरती आली आणि सगळे गणित बिघडले. पाटावर ठेवलेली मूर्ती अर्धी पाण्यात तर अर्धी बाहेरच राहिली. राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा जोडता आला नाही, भरतीच्या लाटा वेगाने आणि विसर्जनाची प्रक्रिया दिवसभर ठप्प झाली.
भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. त्याच वेळी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे तराफ्याजवळ आगमन होताच वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला. स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह हा तराफा असूनही मात्र यश आले नाही. तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती. उधाणामुळे नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यास अडचण निर्माण होत होती. कोळी बांधव दीड तास सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचे पाणी कमी होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नसल्याने दिवसभर विसर्जन खोळंबून राहिले. रात्री आलेले मंडळाचे कार्यकर्ते आणि सकाळपासून आलेले भाविकही लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर थांबून होते. राजा दिवसभर थांबून असल्याने त्यांच्याही चेहर्यावर चिंता दिसत होती. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास भरतीचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लालबागच्या राजाचा पाट असलेला तराफा समुद्राच्या पाण्यावर तरंगू लागला. त्यानंतर हा तराफा खोल समुद्रात नेण्यात आला आणि लालबागच्या राजाचे रखडलेले विसर्जन पार पडले.
लाखो रुपये खर्चून गुजरातहून आणलेला नवा तराफा यंदा पहिल्यांदाच वापरला जात होता. पण भरती-ओहोटीचे योग्य नियोजन न झाल्याने बाप्पा जवळपास 10 ते 12 तास चौपाटीवरच अडकून राहिल्याने गिरगावातील नाखवा हिरालाल वाडकर यांनी मंडळावर थेट आरोप केले. आम्ही वाडकर बंधू वर्षानुवर्षे लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलो. समुद्र आमच्या रक्तात आहे, भरती-ओहोटीचे ज्ञान आम्हाला आहे. पण आता मंडळाने गुजरातच्या तराफ्याला हा मान दिला आणि त्यामुळेच विसर्जन रखडले, असे त्यांनी स्पष्ट केले.