ladki bahin yojana Pudhari
मुंबई

Ladki Bahin Yojana | गरज वाटल्यास ‘लाडकी बहीण’ची केवायसी विंडो पुन्हा ओपन करू : मुख्यमंत्री फडणवीस

अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत; पुरुष लाभार्थ्याकडून वसूल करणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : वारंवार सांगूनही लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही आणि केवायसी करूनही ज्या निकषात बसत नाहीत, अशा महिलांचे मानधन थांबवले आहे. जवळपास 25 लाख महिलांची केवायसी चुकली होती, त्यांना आपण सुधारून घेतले. मी आज महिलांना पुन्हा सांगतो की, कुणालाही वाटत असेल की, आपण योजनेसाठी पात्र आहोत; परंतु आमची केवायसी करायची राहून गेली तर आजही आम्ही केवायसीची विंडो ओपन करायला तयार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र ज्या पुरुषांनी निधी घेतला आहे, त्यांच्याकडून मात्र तो वसूल करूच, असे फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चांवर स्पष्ट खुलासा केला. योजना सुरू केले तेव्हाच उत्पन्न, वय असे निकष होते. स्वयंघोषणेच्या आधारे योजना लागू केली. विविध डेटाबेस तपासला असता 14 हजार पुरुष, 5 लाख सरकारी कर्मचारी, 10 लाख इन्कमटॅक्स भरणारे आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत अशा 4-5 पाच लाख लोकांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतल्याचे समोर आले. यातील अनेकांनी केवायसी केली नाही, केवळ त्यांचेच पैसे थांबविले आहेत. त्यामुळे पुरुषांकडून पैसे वसूल करूच. मात्र ज्या महिला अपात्र आहेत, त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारनेच सोडवले

मराठा आरक्षणाचा प्रश्न तुमची पाठ सोडत नाही, तसेच मनोज जरांगे आंदोलनाला बसतात की त्यांना बसवले जाते, असा प्रश्न फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आमच्या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. हे प्रश्न काही मी मुख्यमंत्री झाल्यावर तयार झालेले नाहीत. 40-50 वर्षांपासूनचे हे प्रश्न आहेत. मात्र त्याची कोणी सोडवणूक केली नाही. 2014 ते 19 या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी हे प्रश्न सोडविले. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सोडविले. आता पुन्हा मी मुख्यमंत्री झालो. आता मी हे प्रश्न सोडवतो आहे. ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांच्याकडेच लोक मागणी करत असतात. आम्ही हे प्रश्न सोडवून दाखविले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT