कुर्ला : प्रसूतीनंतर एका २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यात घडली. या घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी महिला डॉक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी २८ वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच रात्री सिझेरियन प्रसूतीद्वारे तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर महिलेने वारंवार छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. नातेवाईकांचा असा आरोप आहे की, रुग्णाने त्रासाबाबत सांगितले असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ‘‘डॉक्टर उपलब्ध नाहीत’’ असे सांगून नातेवाईकांना ताटकळत ठेवले गेले. इतकेच नव्हे तर, ‘‘हे नाटक आहे, त्रास सहन करा,’’ असे संतापजनक उत्तर तेथील परिचारिकेने दिल्याचे नातेवाईकांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.
महिलेची प्रकृती अधिक खालावल्यानंतर तिला अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. मृत्यूची माहिती देण्यास रुग्णालयाने विलंब केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी रुग्णालयात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
दुसरीकडे, डॉक्टरांनी नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेच्या पोटात दुखत असल्याने तिला आवश्यक इंजेक्शन देण्यात आले होते आणि प्रकृती बिघडताच तिला तत्काळ ICU मध्येही भरती केले होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या मारहाणीच्या घटनेचा निषेध करत संबंधित महिला डॉक्टर गुन्हा दाखल करण्यासाठी कुर्ला पोलिस ठाण्यात दिवसभर ठाण मांडून बसल्या. पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालय येथे पाठवला. या प्रकरणाचा तपास पोलीस आणि आरोग्य विभागाकडून संयुक्तपणे केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणावर तातडीची बैठक बोलावली असून, त्यानंतरच आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.