कुर्ला: मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला असता त्याला विरोध केल्याने मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ला पश्चिम येथे घडली आहे. या घटनेनंतर विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत.
शनिवारी पहाटे कुर्ला बैल बाजार परिसरात ही हत्येची घटना घटना घडली. यातील मयत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडील आणि दोन भावांसोबत याठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून राहत होती.
मुलीच्या एका भावाला गेल्या काही दिवसांपासून कावीळ झाली असून त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र त्याची कावीळ वाढतच असल्याने एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून मुलाला उपचारासाठी त्याचे वडील उत्तर प्रदेश येथे घेऊन जाणार होते. शनिवारी पहाटे कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून त्यांची ट्रेन होती.
मात्र घरात मोठी मुलगी आणि आणखी एक लहान मुलगा असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्याच गावात राहणारा त्यांचा मित्र रामसिंह यादव (३६) याला मुलीच्या वडिलांनी घरी बोलावून घेतले होते. शनिवारी पहाटे गाडी असल्याने शुक्रवारी रात्रीच मुलीचे आई-वडील टर्मिनस येथे दाखल झाले होते.
यावेळी घरात आरोपी, अल्पवयीन मुलगी आणि लहान मुलगा होता. हीच संधी साधत आरोपीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरडा करत त्याला विरोध केला. मुलीने ही बाब कोणाला सांगितल्यास आपली बदनामी होईल ही भीती आरोपीच्या मनात होती. त्यामुळे त्याने पहिल्यांदा मुलीच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली.
मुलगी पडून बेशुद्ध झाल्याचा रचला बनाव
पहाटे चारच्या सुमारास त्याने तिच्या वडिलांना फोन करून मुलगी घरात पडून बेशुद्ध झाल्याचे सांगितले. त्यानुसार तिच्या आई-वडिलांनी गावी न जाता पुन्हा घर गाठले. त्यांनी मुलीला तत्काळ कुर्ला पश्चिमेतील भाभा रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. यावेळी विनोबा भावे नगर पोलिसांनी मुलीच्या वडिलांकडे चौकशी केली असता घटनेच्या वेळी घरात त्यांचा मित्र उपस्थित असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.