Kurla Ganesh Idol Falls on Speed Breaker
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील शीतल तलाव परिसरात मंगळवारी (दि. ८) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. नवपाडा येथून धारावीच्या दिशेने एक गणेशमूर्ती नेण्यात येत होती. पण या वाहनाचा स्पीड ब्रेकरवर अचानक तोल गेला, ज्यामुळे गणेशमुर्ती रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नवपाडा भागातील एका मंडळाची गणेशमूर्ती वाहनातून वाजतगाजत धारावीकडे नेली जात होती. हे वाहन कुर्ल्यातील शीतल तलावाजवळ आले असता, रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने वाहनाला जोरदार झटका बसला. त्यामुळे वाहनावरील गणेशमूर्तीचा तोल अचानक सुटला आणि ती थेट रस्त्यावर कोसळली.
मूर्ती खाली पडताच उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परतेने जमावाला पांगवून शांतता राखण्याचे आवाहन केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
यानंतर धार्मिक परंपरेचा आदर राखत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून संबंधित गणेशमूर्तीचे जवळच असलेल्या शीतल तलावात विधिवत व शांततेत विसर्जन केले. पोलिसांच्या वेळीच दाखवलेल्या दक्षतेमुळे संभाव्य तणाव टळला असून परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.