Kurla Building Fire Pudhari
मुंबई

Kurla Building Fire: कुर्ल्यात १२ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, धुरामुळे रहिवाशांची धावपळ

Kurla Building Fire: इमारतीत धूर पसरल्याने पाच वर्षांच्या मुलासह नऊ जण जखमी झाले असून, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Rahul Shelke

Kurla Building Fire: मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात मंगळवारी पहाटे आगीची गंभीर घटना घडली. कोहिनूर HDIL इमारत क्रमांक ५ मधील इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने अचानक पेट घेतला. काही वेळातच इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या धुरामुळे रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत पाच वर्षांच्या मुलासह नऊ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

पहाटे आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर HDIL इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला आग लागली. ही इमारत तळमजला अधिक १२ मजल्यांची आहे. आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मंगळवारी सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस, वीज विभागाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सकाळी ७ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीची तीव्रता अधिक असल्याने इमारतीतील काही मजल्यांवरील लोखंडी दरवाजांचेही नुकसान झाले. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर बचावकार्याला वेग देण्यात आला.

धुरामुळे आठ जणांना श्वास घेण्यास त्रास

या घटनेत सर्वाधिक त्रास दाट धुरामुळे झाला. इमारतीत धूर साचल्याने आठ जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. तर आणखी एका व्यक्तीच्या उजव्या पायाला दुखापत झाली. जखमींमध्ये पाच वर्षांचा मोहम्मद शेख, दोन अल्पवयीन मुली आणि एका ६५ वर्षीय वृद्धाचाही समावेश आहे.

सर्व नऊ जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जखमींमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश

या आगीच्या घटनेत ईशान अहमद (३०), फरिना बोनो (२७), एजाज अहमद (६५), फरीन शेख (१८), नायदा शेख (१४), कलिमा सहा (४५), अलिना शेख (१७) आणि जाहेद अली शेख (५५) हे जखमी झाले आहेत. याशिवाय पाच वर्षांच्या मोहम्मद शेख या बालकालाही धुराचा त्रास झाला.

पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. इमारतीतील वायरिंगमध्ये नेमकी कोणती समस्या निर्माण झाली होती, याचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT