मुंबई : विविध मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईतर्फे कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव तसेच ते अबाधित ठेवण्यासाठी गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी कुणबी बांधवांच्या संघाचे अध्यक्ष अनिल नवगने यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर मोर्चा आंदोलन करण्यात आले. आमच्या आरक्षणात मराठा समाजाला घुसवले जात आहे. मनोज जरांगे यांच्या दबावाखाली काढलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
गुरुवारी कुणबी आंदोलक मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले होते. ‘आमची सरकारकडे फार मोठी मागणी नाही. मराठा समाजाला कुणबी आरक्षणात घुसवले जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश तातडीने मागे घ्यावा. आम्ही शांततेत मागणी करत आहोत. पण सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर समाज आक्रमक होईल’, असा इशाराच या आंदोलकांनी सरकारला दिला. जन्माने आणि कर्माने कुणबी असलेल्या कुणबी समाजाच्या वतीने सरकारकडून होत असलेल्या अन्याय विरोधात आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात आले.