पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) हा बहुचर्चित चेहर्यांपैकी एक झाला आहे. विडंबन गीतावर आपण कोणाचीही माफी मागणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली आहे. वादाच्या भोवर्यात सापडलेल्या कुणालने आज (दि.२) सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवर एक पोस्ट करत माफी मागितली आहे. जाणून घेवूया कुणाल कामराने नेमक[ कोणाची माफी मागितली आहे याविषयी...
कुणाल कामराने आज X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माझ्या शोमध्ये आल्यानंतर तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी माफी मागतो. कृपया मला मेल करा जेणेकरून तुम्हाला देशात कुठेही जायचे असेल तर मी तुमच्यासाठी सहलीचे आयोजन करु शकेन.
कुणाल कामराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबन गीत सादर केले. यानंतर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. दरम्यान, कुणालच्या शो दरम्यान उपस्थित असलेल्यांना मुंबई पोलिसांनी अलीकडेच नोटीस बजावली आहे. कुणालच्या प्रेक्षकांमध्ये मुंबईचा एक बँकर ही हाेते. ते अलिकडेच तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांना चाैकशीसाठी नोटीस पाठवली हाेती. त्यांना प्रकरणात साक्ष देण्यासाठी मुंबईला परतावे लागले. आता कुणाल कामराने त्याच्या ट्विटमध्ये याच बँकरची माफी मागितली आहे आणि त्याच्यासाठी सहलीचे आयाेजन करणार असल्याचे म्हटलं आहे.
कुणाल कामराला पोलिसांनी तिसरे समन्स बजावले आहे. त्याला ५ एप्रिल रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. मुंबई उपनगरातील खार पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश त्याला देण्यात आले आहेत. या प्रकरणी गेल्या महिन्यात त्याच्याविरुद्ध येथे एफआयआर दाखल करण्यात आला होता. याआधी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. अनेक समन्स मिळाल्यानंतरही, कामरा अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही.
विनोदी कलाकार आणि बॉलिवूड पटकथा लेखक आणि गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी विनोदी कलाकार कुणाल कामराची पाठराखण केली आहे. कुणालने वादग्रस्त विधान केले होते त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या लोकांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. पोलीस या लोकांची चौकशी करत आहेत. ग्रोव्हरने यावर टीका करत म्हटले आहे की, प्रेक्षकांना समन्स पाठवण्याऐवजी, मुंबई पोलिसांनी स्वतः कार्यक्रमात सामील व्हावे. लोकांना विचारण्याऐवजी त्यांनी कुणालच्या विनोदांवर स्वतःचा निर्णय द्यावा, असेही आवाहन केले आहे.