मुंबई : भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम म्हणजे कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज सोसायटीचा 46 वा गणेशोत्सव. यंदा साजरा होणार्या या मंगलमहोत्सवाला एक वेगळाच गोडवा लाभला आहे, कारण यावर्षीची थीम आहे -कृष्णलीला.
प्रेमानंद महाराजांच्या प्रेरणेतून या वर्षीची देखणी सजावट उभारण्यात आली आहे. प्रत्येक देखावा आमच्या छत्रपतींचा महाराजा गणेश मंडळाने हस्तकलेने व श्रद्धेने साकारलेला आहे. ही सजावट केवळ कलाकुसर नसून, प्रत्येक तपशिलात दडलेली भक्ती, भावना आणि समर्पणाची प्रचीती आहे. मंडपाच्या मध्यभागी श्री राधाराणी व श्रीकृष्ण झोपाळ्यावर विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे मोरपिसांनी सजवलेली अप्रतिम पार्श्वभूमी मंडपाला अद्वितीय दिव्यता प्रदान करते.
मंडपातील छतावर श्रीकृष्णाच्या मोहक लीलांचे चित्रण, खांबांवर मीरा बाईची भक्तीमग्न मुद्रा, सुदामाजीचे मैत्रभावाचे दर्शन, वासुदेवजींनी बालकृष्णाला टोपलीतून नेण्याचा थरारक देखावा साकारण्यात आला आहे. तसेच, गुहेत उभारलेले प्रेमानंद महाराजजींचे सजीव भासणारे त्रिमितीय (थ्रीडी) मॉडेल भाविकांना आध्यात्मिक उर्जा व प्रेरणा प्रदान करते.