मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या कोकणकन्यासह तुतारी व मांडवी एक्सप्रेस गाड्या गणेश चतुर्थीच्या काळात हाउसफुल झाल्यामुळे कोकणवासीयांची घोर निराशा झाली आहे. आता कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी त्यांना गणपती स्पेशल गाड्यांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष मध्य व पश्चिम रेल्वेच्या घोषणांकडे लागले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकण कन्यासह मांडवी, तुतारी जनशताब्दी या प्रमुख गाड्या हाऊसफुल झाल्या आहेत. अनेक गाड्यांचे वेटिंग तिकीटही देणे बंद झाले आहे.
त्यामुळे विशेष गाड्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. विशेष गाड्यांची घोषणा झाल्यानंतरही या गाड्या अवघ्या काही मिनिटात हाऊसफुल होत असल्यामुळे लाखो कोकणवासीयांचे मध्य व पश्चिम रेल्वेच्या घोषणांकडे लक्ष लागले आहे.
मध्य व पश्चिम रेल्वे दरवर्षी गणेश चतुर्थीमध्ये रत्नागिरी, सावंतवाडी व मडगावपर्यंत मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या चालवते. यात वातानुकूलित गाड्यांसह एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचा समावेश असतो.
या गाड्यांमध्येही जागा नसल्यामुळे भाजपासह शिवसेना मनसे व अन्य विविध राजकीय पक्षांनी सोडलेल्या विशेष एसटी व खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे यावेळी कोणते राजकीय पक्ष किती बस सोडणार, याची विचारणा आतापासूनच सुरू झाली आहे.
मोदी व शिवसेना एक्सप्रेसही धावणार !
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला मोदी व शिवसेना एक्सप्रेसही धावणार आहे. मोदी एक्सप्रेस ही मंत्री नितेश राणे तर शिवसेना एक्सप्रेस ही आमदार निलेश राणे यांच्यामार्फत चालवण्यात येते. या एक्सप्रेसमधील प्रवास मोफत असून प्रवाशांना जेवण व पाणीही मोफत दिले जाते. त्यामुळे या एक्सप्रेसच्या घोषणांकडेही कोकणवासीय लक्ष ठेवून आहे.
२० ऑगस्टनंतर विशेष गाड्यांची घोषणा
गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला असल्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेकडून २० ऑगस्टनंतर विशेष गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गाड्या सीएसएमटीसह दादर, कुर्ला लोकमान्य टिळक, वांद्रे, अहमदाबाद, पुणे व्हाया पनवेल चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे ९, १०, ११, १२ व १३ सप्टेंबरला सुटणाऱ्या विशेष गाड्यांच्या आगाऊ आरक्षणाची घोषणा कधी होणार, याकडेही कोकणवासीय लक्ष ठेवून आहेत.