मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल असल्यामुळे कोकणवासियांचा खडतर प्रवास सुरू झाला आहे. जनरल व स्लीपर कोच प्रवाशांनी खचाखच भरून जात असल्यामुळे कोकणवासीय त्रस्त आहेत. पण गावी जाण्याची हौस असल्यामुळे कधी कुणी तक्रारच करत नाहीत.
उन्हाळ्याची सुट्टी, होळी व गणेश चतुर्थीला कोकणात प्रवास करायचा म्हटला तर तारेवरची कसरत असते. नियमित गाड्यांसह विशेष गाड्या एक दोन मिनिटातच हाउसफुल होत असल्यामुळे प्रवाशांना वेटिंग तिकीटवर समाधान मानावे लागते.
परंतु कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोणत्याच गाडीचे वेटिंग तिकीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी दाटीवाटीने जनरल डब्यासह चक्क स्लीपरच्या आरक्षित डब्यातून प्रवास करतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावर सर्व गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत.
कोकण कन्या, तुतारी, मांडवी या गाड्यांमधून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. या गाड्यांच्या जनरल डब्यामध्ये बोट शिरेल इतकी ही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेक जण डब्यातील शौचालयातील मोकळ्या जागेचा वापर करतात. तीही जागा मिळाली नाही तर थेट स्लीपरमधील मोकळ्या जागेचा ताबा घेत आहेत. त्यामुळे सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील गर्दीचा उच्चांक झाला आहे.
गाड्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट गर्दी
एक्सप्रेस गाड्यांच्या एका डब्यामध्ये सरासरी 72 ते 80 स्लीपर आसने असतात. पण या डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्यामुळे 150 ते 160 नागरिक प्रवास करतात. जनरल डब्याची प्रवासी क्षमताई जेमतेम 125 ते 130 इतकी असते. पण या डब्यातून 250 पर्यंत नागरिक प्रवास करतात.
शौचालयाला जायचे वांधे
स्लीपर कोचचे आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशाला गर्दीमुळे रात्रीच्या वेळी शौचालयापर्यंत जाण्याचेही वांदे होतात. डब्यात खाली झोपलेल्या बसलेल्या नागरिकांमधून कशीबशी वाट काढत शौचालय गाठावे लागते. शौचालय गाठले तरी काही प्रवासी चक्क शौचालयामध्येच उभे असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो.
होळी, गणपतीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी रोखणे अशक्य असते. रेल्वे प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता असते. रेल्वे प्रशासनाकडून आरक्षित डब्यातील प्रवाशांना डब्यात शिरता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.