कोकण विभागातील एकूण २७ प्रमुख नद्यांपैकी ८ नद्या धोक्याच्या आणि इशारा पातळीवर वाहत आहेत. Pudhari
मुंबई

Konkan Floods | कोकणात ८ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

कोकण विभागातील एकूण २७ प्रमुख नद्यांपैकी ८ नद्या धोक्याच्या आणि इशारा पातळीवर

पुढारी वृत्तसेवा

Heavy Rain Konkan

नवी मुंबई: कोकण विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोकण विभागातील एकूण २७ प्रमुख नद्यांपैकी ८ नद्या धोक्याच्या आणि इशारा पातळीच्या वर किंवा आसपास वाहत असल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित १९ नद्या सध्या इशारा पातळीच्या खाली वाहत असल्या तरी पावसाचा जोर पाहता प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात उल्हास नदीने बदलापूर येथे १६.८० मीटर पातळी गाठून इशारा पातळी (१६.५० मीटर) ओलांडली असून ती धोक्याच्या पातळीच्या (१७.५० मीटर) दिशेने वाहत आहे. तर अंबरनाथमधीलच जांभूळपाडा येथे उल्हास नदी १३.२० मीटरवर वाहत असून तिने १३.०० मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण तालुक्यात उल्हास नदी मोहने येथे ८.८३ मीटरवर असून येथील इशारा पातळी ९.०० मीटर आहे. टिटवाळा येथील काळू नदीने १०२.०० मीटरची इशारा पातळी गाठली असून शहापूरमधील भातसा नदी ३२.४० मीटरवर (इशारा पातळी ३६.०६ मीटर) वाहत आहे.

पालघर जिल्ह्यात मात्र नद्यांची पातळी सध्या नियंत्रणात असून सूर्या नदी (मासवण) ५.५० मीटर, वैतरणा ९८.७० मीटर आणि पिंजाळ नदी ९८.८० मीटर पातळीवर वाहत आहे, ज्यांच्या इशारा पातळी अनुक्रमे ११.०० मीटर, १०१.९० मीटर आणि १०२.७५ मीटर आहेत. रायगड जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

रोहा येथील कुंडलिका नदी २४.३० मीटरवर वाहत असून तिने २३.९५ मीटरची धोक्याची पातळी पार केली आहे. रोह्यातीलच अंबा नदीने ९.०० मीटरची धोक्याची पातळी ओलांडून १२.०० मीटरची चिंताजनक पातळी गाठली आहे. महाडची सावित्री नदी ७.४० मीटरवर वाहत असून तिने ६.५० मीटरची धोक्याची पातळी केव्हाच मागे टाकली आहे.

पनवेल येथील पाताळगंगा नदीने २१.५२ मीटरची धोक्याची पातळी गाठली असून कर्जत येथील उल्हास नदी ४७.४० मीटर (इशारा पातळी ४८.१० मीटर) आणि पनवेलमधील गाढी नदी ४.९० मीटर (इशारा पातळी ६.०० मीटर) पातळीवर वाहत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नद्यांच्या पातळीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदी ९.८० मीटरवर वाहत असून तिने ७.०० मीटरची धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण केली आहे.

चिपळूणची वाशिष्टी नदी ४.१८ मीटर (इशारा पातळी ५.०० मीटर), संगमेश्वरमधील शास्त्री नदी ४.६० मीटर, सोनवी नदी ४.४० मीटर आणि बावनदी ७.२५ मीटरवर वाहत आहे. लांजा येथील काजळी नदी १४.९२ मीटर आणि मुचकुंदी नदी १.७५ मीटरवर आहे, तर राजापूरची कोदवली नदी २.७५ मीटरवर वाहत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथील तिलारी नदी ३८.३० मीटर, सावंतवाडीतील तेरेखोल नदी २.३० मीटर, कुडाळची कर्ली नदी ५.०० मीटर, कणकवलीतील गडनदी ३५.४० मीटर आणि वैभववाडीतील वाघोटन नदी ६.८० मीटर पातळीवर वाहत असून येथील सर्व नद्या सध्या इशारा पातळीच्या खाली आहेत. पुढील २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT