नवी मुंबई: कोकण विभागात झालेल्या पावसामुळे विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार कोकण आणि परिसरातील प्रमुख धरणांची सद्यस्थिती समाधानकारक आहे. ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणात सर्वाधिक २९६.२८ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. यासोबतच बारवी धरणात ८९.३१ दशलक्ष घनमीटर, मोडकसागर धरणात ३४.५८३ दशलक्ष घनमीटर आणि तानसा धरणात १६.०६७ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात ८९.११ दशलक्ष घनमीटर आणि कवडास धरणात ८.२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा नोंदवला गेला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १ मध्यम प्रकल्प कार्यरत आहे. तसेच जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने म्हणजेच १००% भरले आहेत. रायगडमधील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हेटवणे मध्यम प्रकल्पाची एकूण साठवणक्षमता ५.१२ टीएमसी इतकी असून, हा प्रकल्प आजपर्यंत ५३.२३% भरला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमध्येही पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये गडनदी धरणात ६५.७८ दशलक्ष घनमीटर, नातूवाडी धरणात ६४.६१ दशलक्ष घनमीटर आणि अर्जुना धरणात ४२.९८२ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी या मोठ्या प्रकल्पात तब्बल ४४७.३६९ दशलक्ष घनमीटर इतका प्रचंड उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. सिंधुदुर्गातील मध्यम प्रकल्पांमध्ये देवघर धरणात ९८.०२ दशलक्ष घनमीटर साठा असून, अरुणा धरणात ९२.०२५ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध आहे व तेथून १८.४५ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तसेच कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्पात २५.४७४ दशलक्ष घनमीटर साठा असून तेथून ८९.१३ घनमीटर प्रतिसेकंद या वेगाने धरणातून विसर्ग केला जात आहे.