मुंबई : मालाड पूर्वेतल्या कोकणी पाडा या डोंगरावर वसलेल्या वसाहतीला दरडींबरोबर झाडांचाही धोका वाढला आहे. pudhari photo
मुंबई

Tree fall risk Kokani Pada : कोकणी पाड्याला दरडींसह झाडांचाही धोका!

झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रहिवासी भयभीत

पुढारी वृत्तसेवा
मुंबई : निसार अली

मालाड पूर्वेतला कोकणी पाडा ही अगदी डोंगरावर वसलेली वस्ती आहे. 65 ते 70 वर्षे जुनी ही वसाहत असून अधिकतर कोकणातील लोक राहात असल्याने कोकणी पाडा असे नाव पडल्याची माहिती एका रहिवाशाने दिली. सध्या येथे एसआरएचे काही प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी या डोंगरावरील पंडित चाळ, ओमसाई, श्री साईनाथ सोसायटी अशा काही चाळींमधील जवळपास अडीचशे कुटुंबे दरडींच्या छायेत आहेत.

या वस्तीतील अधिकतर रहिवासी हातावर पोट असणारे आहेत. या डोंगरावरील लोकांना दरडींप्रमाणेच मोठ्या झाडांचा धोका आहे. बरीचशी झाडे वार्‍यामुळे झुकली आहेत. कधीही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे. काही झाडे पावसाळ्यात कोलमडून पडली आहेत.

प्रशासनाने दगडी संरक्षक भिंत बांधली असली तरी त्याच्या वरील भागात असलेल्या या झाडांमुळे माती सुटी झाली असून हा भाग कधीही खचू शकतो, अशी भीती येथील रहिवाशांना सतावते आहे. पंडित चाळ, ओमसाई, श्री साईनाथ सोसायटी असलेला भाग हा शेवटच्या टोकाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तो भाग मातीचा आहे. त्यामुळे दरडीप्रमाणेच झाडे पडून दुर्घटना घडण्याची भीती येथील रहिवाशांना वाटते.

या वस्तीत पाण्याचा प्रश्नही जटिल आहे. पाणी अतिशय कमी दाबाने येत असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. बेस्ट बससाठीही पायपीट करावी लागते. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने काही दुर्घटना घडल्यास रुग्ण वाहिकेला ये-जा करण्यासही कठीण होत आहे.

आम्ही 65 वर्षांहून अधिक काळापासून येथे राहात आहोत. माझा जन्म याच वस्तीत झाला. पूर्वीपेक्षा आज परिस्थिती थोडी सुधारली असली तरी पावसाळ्यात दरडींचा धोका कायमच आहे. विशेषकरून ज्यावेळी वादळ होते किंवा जोरदार वारे वाहतात, त्यावेळी प्रचंड भीती वाटते.
शकील खान, स्थानिक रहिवासी
आम्ही पन्नास वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी वास्तव्य करत आहोत. काही दिवसांपूर्वीच झाड पडल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. फारसे आर्थिक नुकसानही झाले नाही. पण जोरदार पाऊस झाला की मात्र धडकी भरते. झाडे पडू नयेत, तसेच माती सुटी होऊ नये यासाठी उर्वरित भागात लोखंडी जाळ्या लावायला हव्यात.
लहू बावडेकर, स्थानिक रहिवासी
या डोंगरावरील काही भागात एसआरए प्रकल्पांतर्गत विकास सुरू झाला आहे. त्यामुळे आम्हाला आशेचा किरण दिसत आहे. मात्र प्रकल्प गतीने सुरू राहायला हवेत. त्यामुळे रहिवाशांना फायदा होईल आणि दरडींच्या भीतीपासून कायमची सुटका होईल.
हसमुख घोघरी, स्थानिक रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT