Kiran Mane Post On Nepal Crisis :
नेपाळधील Gen Z ने देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरूद्ध तीव्र आणि हिंसक आंदोलन करत सत्ता उलथवून लावली. नेपाळमधील आंदोलकांनी संसद, न्यायालय आणि मंत्र्यांची घरे पेटवून दिली. त्याचबरोबर अनेक मंत्र्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांविरूद्ध देखील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सरकारी मालमत्तेचं प्रचंड नुकासन या आंदोलनादरम्यान झालं आहे. दरम्यान, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लष्कर सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताचा सख्खा शेजारी आणि अत्यंत जवळचा मित्र असलेल्या नेपाळमधील परिस्थितीचे पडसाद भारतात देखील पडत आहेत. अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र अभिनेता किरण माने यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळं सध्या वाद निर्माण झाला आहे. याबाबत नाशिकच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं किरण मानेंविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
किरण माने यांनी फेसबूकवर नेपाळमधील सुरू असलेल्या आंदोलनाचा आधार घेत एक पोस्ट केली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट...'
या पोस्टवर भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात ABVP नं आक्षेप घेतला आहे. त्यांनी किरण माने यांनी या पोस्टमधून नेपाळप्रमाणे भारतात परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला. ही भारताच्या लोकशाहीविरोधात उठाव करण्यासाठी प्रवृत्त करणारी पोस्ट आहे असा आरोप एबीव्हीपीनं केला. ही तक्रार नाशिकच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत सायबर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय मात्र अद्यप गुन्हा नोंद झालेला नाही.
किरण माने यांच्या पोस्टबाबत भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळं या पोस्टवरून राजकीय पटलावर का प्रतिक्रिया उमटतात हे पहावं लागेल. दरम्यान, यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एक सूचक आणि खोचक असं ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी अशी परिस्थिती भारतात देखील उद्भवू शकते असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं होतं.