मुंबई : खान अकॅडमी इंडिया आणि महाराष्ट्र सरकार आता राज्यातल्या सरकारी शाळांमधील मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित, चांगल्या दर्जाचे डिजिटल शिक्षण साहित्य मोफत देणार आहे. यासाठी 5 वर्षांचा करार झाला आहे. या करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.
डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत, खान अकॅडमीचे डिजिटल साहित्य राज्यातल्या 62,000 पेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये वापरले जाईल. या कार्यक्रमांतर्गत, राज्यातील विद्यार्थ्यांना खान अकॅडमीचे जागतिक दर्जाचे, राज्य अभ्यासक्रमाशी पूर्णपणे संलग्न असलेले गणित आणि विज्ञानाचे साहित्य मराठी आणि इंग्रजी भाषेत आयुष्यभर विनामूल्य उपलब्ध होईल. हे साहित्य सगळ्या शाळा, शिक्षक आणि मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचावे, यासाठी खान अकॅडमी इंडिया आणि शिक्षण विभाग एकत्र मिळून काम करतील. एवढंच नाही, तर खान अकॅडमीच्या मदतीने मुलं घरीही अभ्यास करू शकतील. यासाठी पालकांनाही यात जोडून घेण्याचा प्रयत्न असेल.
खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक,स्वाती वासुदेवन म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये आमची सुरुवात 488 शाळांपासून झाली होती, आणि आता आम्ही संपूर्ण राज्यात पोहोचायला तयार आहोत. शिक्षणामुळे फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास होतो, यावर आमचा विश्वास आहे आणि ही भागीदारी त्याचाच एक पुरावा आहे.
महाराष्ट्रातल्या आमच्या भागीदारांसोबत मिळून आम्ही असं भविष्य घडवत आहोत, जिथे कुठल्याही घरातून आलेल्या प्रत्येक मुलाला जगातलं सर्वोत्तम शिक्षण मिळेल आणि तो यशस्वी होईल, हे पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.