मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शहापूरच्या धसईत कर्म रेसिडेन्सीच्या नावाखाली ११ हजारांहून अधिक गृहखरेदीदारांची एक हजार कोटीहून अधिक रकमेने फसवणूक करणाऱ्या कर्म रिअल इस्टेट कंपनीची १९ कोटींची संपत्ती अखेर ईडीने जप्त केली आहे. हा मुंबई परिसरातील गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. मात्र गृहखरेदीदारांची फसवणूक हजारांहून अधिक कोटींची आणि जप्ती केवळ १९ कोटींची असल्याने या गोरगरीब खरेदीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकार, बँका व नियामक संस्थांनी वाऱ्यावर सोडल्याने या गोरगरीब खरेदीदारांना न्यायासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करावा लागत आहे. घरबांधणीसाठी अयोग्य असलेल्या जमिनीवरील घरे वा गाळे स्वस्तात मिळत असल्याचे आमिष दाखवून ११ हजारांहून अधिक गृहखरेदीदार फसवले गेले आहेत. या कंपनीसाठी जाहिरात करणारा बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय देखील या घोटाळ्याने संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विवेक ओबेरॉयने जाहिरातींचा केल्यामुळेच अनेक खरेदीदारांनी या कंपनीवर विश्वास ठेवला. त्याचा या प्रकल्पाशी संबंध जोडला जात आहे. मात्र, ईडीने सध्या तरी ओबेरॉय यांच्यावर थेट कुठलाही गैरकृत्याचा आरोप केलेला नाही. चौकशीचा केंद्रबिंदू कंपनीचे संचालक आणि इतर प्रमुख जबाबदार व्यक्तीच आहेत. या भयंकर घोटाळ्यात फसललेल्या गृहखरेदी दारांना अद्याप कोणताही दिलास मिळालेला नाही. आरोपी संचालकांपैकी पोलीस फक्त केतन पटेल याला अटक करू शकली. या घोटाळ्याचे सूत्रधार रमाकांत जाधव, नामदेव जाधव आणि सतिश पिलंगवाड हे तिघेही फरार असल्याचे सांगितले जाते.
कर्म डेव्हलपर्सन कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडणारी घरे म्हणून विविध प्रकल्पांचा जाहिराती केल्या होत्या. यामध्ये शाहपूरज-वळील धसई गाव येथील 'कर्म रेसिडेन्सी', शाहपूर परिसरातील कासगाव येथील 'कर्म पंचतत्त्व' आणि पालघर येथील केळवे रोड परिसरातील 'कर्म ब्रम्हांड' या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये कंपनीने शेतीसाठी असलेल्या जमिनी या बांधकामांसाठी तयार असल्याचे भासवले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे घरे व गाळ्यांची विक्री केली. प्रत्यक्षात ही घरे बांधलीही गेली नाहीत आणि त्यामुळे अनेक लोकांचे आयुष्यभराचे पैसे वाया गेले. आज या खरेदीदारांना गेली १० ते १२ वर्षांपासून घराच्या कर्जाचे हप्ते भरावे लागत असून घरे मात्र त्यांना मिळालेली नाहीत. उलट त्यांची कागदपत्रे वापरून कर्म रिअल इस्टेट परस्पर कर्ज उचलून मोकळी झाली.
कर्म रिएलिटीजने गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीसाठी ज्या जागा दाखवल्या त्या जागांचे मालकी हक्क निर्विवादपणे स्पष्ट नव्हते (टायट क्लिअर नव्हते). जमीनी अकृषक करण्यात आल्या नव्हत्या. तरीही महारेराने या प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्र दिले आणि जिल्हाधिका-यांनी या जमिनी अकृषक असल्याचे दाखवून ग्राहकांची फसवणूक केली. हजारो गृह खरेदीदारांनी ३२१ कोटी गृहकर्ज घेत कर्म कंपनीला दिले तर ७०० कोटींहून अधिक रक्कम स्वतःच्या जवळची दिली आहे. ११ हाजारंहून अधिक लोकांची किमान एक हजार कोटीहून अधिक रकमेने फसवणूक झाली आहे, अशा शब्दात या घोटाळ्याविरूध्द व फसवणुकीविरूध्द लढणारे प्रभूराम गिरी यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
या घोटाळ्यात महारेरा, जिल्हाधिकारी कार्यालय, बँका आदी सर्वच घटक सामील असल्याची शंका या गृहखरेदीदारांना वाटते. दोन-तीन बँकांनी एकाच फ्लॅटवर कर्ज दिले आहेत. गृहखरेदीदार कर्ज फरत फेड करीत नसल्याने संपत्ती जप्त करा, असा घोषा आम्ही बँकांकडे लावल्यावरही ते कारवाईसाठी हात वर करीत आहेत. कारण त्यांनाही माहिती आहे तेथे घरे बांधलीच गेलेली नाहीत. मग बँकांनी कर्जे कशी दिली, असा प्रश्नही गिरी यांनी विचारला. कर्म कंपन्यांची संपत्ती सीआयडी ताब्यात का घेत नाही, यावरून राज्य सरकार, पोलिस व ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय मिळत नसल्याने या गृहखरेदीदारांनी गिरी यांच्या नेतृत्वात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. याच काळात गृहखरेदीदारांच्यावतीने गिरी यांनी ईडीकडे धाव घेत कर्म रिएलिटीची संपत्ती ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार ही संपत्ती ताब्यात घेतल्याबद्दल गिरी यांनी आनंद व्यक्त केला.
कर्म रेसिडेन्सी
शाहपूर परिसरातील धसई या गावातील या प्रकल्पात एकूण ३ हजार १४० सदनिका बांधण्यात येतील, असे कंपनीने जाहीर केले होते. डिसेंबर २०१४ ला हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगितले गेले होते. मात्र हा प्रकल्प आजही पूर्ण झालेला नाही.
कर्म पंचतत्त्व
शहापूर परिसरातील कासगावात १ ते ३ टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार होता. मात्र पहिल्या टप्प्यातील बांधकाम केवळ पायापुरतेच करण्यात आले असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जमिनी आजही ओसाड आहेत.
कर्म ब्रम्हांड
पालघरजवळील केळवे रोड परिसरात कर्म ब्रम्हांड हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पात एकूण ५ हजार घरे बांधण्यात येणार होती. मात्र साडे चार हजार घरांची विक्री होऊनही या प्रकल्पाचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही.