घाटकोपर : गणेशोत्सवाच्या तोंडावरही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अद्याप दयनीय आहे. रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. पालकमंत्री आशिष शेलार यांनी खड्डेमुक्त रस्त्यांचे आदेश दिले असतानाही, शहरातील अनेक भागांमध्ये खड्ड्यांचा प्रश्न आवासून उभा आहे. विक्रोळीतील कन्नमवारनगर हे त्याचेच एक चांगले उदाहरण आहे.
या भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून सततच्या पावसामुळे नुकतेच टाकलेले डांबरदेखील उखडले गेले आहे.यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्याला जबरदस्त त्रास होतो आणि रिक्षा चालवणेही कठीण जात असल्याचे काही रिक्षाचालकांनी बोलताना सांगितले.
आगामी गणेशोत्सवात हजारो भाविक रस्त्यावर उतरतील, त्यावेळी रस्त्यांची ही अवस्था गंभीर समस्या निर्माण करू शकते. याबाबत नागरिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे लवकरात लवकर महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचा पाढा सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला असून प्रशासनाने खड्डेमुक्त रस्त्यांची तात्काळ व्यवस्था करावी.डॉ. वेदप्रकाश तिवारी वकील, मुंबई उच्च न्यायालय
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून यामुळे लोकांना पाठदुखी, मानेच्या विकारांना सामोरे जाण्याची शक्यताही बळावली आहे. विक्रोळीत खड्डे बुजवण्याचे काम केवळ दिखावा असून हे खड्डे नागरिकांच्या शरीरावर कायमस्वरूपी जखमा करत आहेत.डॉ. योगेश भालेराव