Kandivali Stall Demolition Pudhari
मुंबई

Kandivali Stall Demolition: कांदिवलीत ५० वर्षे जुना स्टॉल पाडल्याने संताप; शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

साईनगरमधील अनिता ठुकरुर यांच्या स्टॉलवर पालिकेची कारवाई; सहाय्यक आयुक्तांच्या दालनात पदाधिकाऱ्यांचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली: कांदिवली पश्चिम येथील साईनगर परिसरात गेल्या ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या अनिता ठुकरुर या मराठी महिलेचा जुना व अधिकृत स्टॉल महापालिकेच्या आर/दक्षिण विभागाने ५ नोव्हेंबर रोजी केलेल्या बुलडोझर कारवाईत उद्ध्वस्त केला.

या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) पक्षाच्या विभाग क्र. २ मधील पदाधिकारी व शिवसैनिकांनी विभागप्रमुख संतोष राणे व मनाली चौकीदार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

दिवाळीनिमित्त महापालिकेतर्फे आयोजित संगीत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक व उपरोधिक संगीत कार्यक्रम सादर करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी करत संबंधित महिलेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पन्नास वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा स्टॉल कोणतीही सूचना न देता ऐन दिवाळीत उद्ध्वस्त करून प्रशासन नेमके कोणाच्या हिताचे काम करत आहे, असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत आर/दक्षिण सहा. आयुक्तांच्या दालना बाहेर आंदोलन केले. याची गांभीर्याने दखल घेण्याचे निवेदन सहा. आयुक्त आरती गोळेकर यांना दिले. यावर गोळेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात विधानसभा प्रमुख राजू खान, विधानसभा समन्वयक राजन निकम, उपविभागप्रमुख आशिष पाटील, श्याम मोरे, नगरसेवक सचिन पाटील, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, महिला विधानसभा प्रमुख सुषमा कदम यांच्यासह चारकोप व कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील महिला व पुरुष शाखाप्रमुख, विभाग क्र. २ मधील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिकृत परवाना असूनही ५० वर्षे जुना स्टॉल, सूचना न देता, जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केला. ऐन दिवाळीत मराठी महिलेवर अन्याय आम्ही सहन करणार नाही. महापालिकेने पर्यायी जागा द्यावी.
-संतोष राणे, विभाग प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT