मुंबई : प्रकाश साबळे
कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला सिंग इस्टेट १२० फुटी विकास नियोजीत रस्ता रुंदीकरणातील बाधित १२० झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून सुहास मोदी सहकारी गृहनिर्माण संस्था इमारत क्र. ३ मधील (महावीर कंन्स्ट्रक्शन) पीएपी सदनिका मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. यामुळे झोपडीधारकांमध्ये नाराजी पसरली असून प्रस्तावित घरे लवकरात लवकर देण्याची मागणी आता झोपडीधारकांनी केली आहे.
येथील १२० फूट रुंदीकरणातील रस्त्यामधील बाधित ४७ झोपडीधारकांचे पालिका आर. दक्षिण विभागाने १ ऑगस्ट २०२५ रोजी ठाकूर व्हिलेज येथील बिटकॉन या पीएपी सदनिकामध्ये पुनर्वसन केलेले आहे. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील महावीर कंन्स्ट्रक्शनमधील उपलब्ध सदनिकांमध्ये पुनर्वसन रखडले आहे.
आम्ही १२० फूट रस्ता रुंदीकरणातील बाधित झोपडीधारकांसाठी सुहास मोदी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पीएपी सदनिकांचा ताबापत्र १६ जुलै २०२५ रोजी एसआरए प्रशासनाला दिले आहे. यामुळे आमच्याकडील प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.पिनाकिन शहा, विकासक, महावीर कंन्स्ट्रक्शन
पहिल्या टप्प्यातील झोपडीधारकांचे पुनर्वसन होऊन तीन महिन्यांचा कालावधी झालेला असताना दुसऱ्या टप्प्यातील पीएपीच्या सदनिका हस्तांतरित करण्यासाठी इतका विलंब का होतोय, असा सवाल बाधित झोपडीधारकांनी उपस्थित केला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग यांना प्रस्ताव सादर केला आहे. मात्र गृहनिर्माण विभागाकडून एसआरए प्राधिकरणाला अद्यापही कुठलीही सूचना अथवा आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत, परिणामी येथील बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन लांबल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
सुहास मोदी गृहनिर्माण सोसायटीतील उपलब्ध पीएपी सदनिकांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव गेलेला आहे. गृहनिर्माण विभागाची मंजुरी आल्यानंतर एसआरए प्रशासनाकडून सदनिका पालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्यात येतील आणि त्यानंतर त्या बाधितांना वाटप होतील.संजय कुऱ्हाडे, उपायुक्त, परिमंडळ -८