प्रकाश साबळे
मुंबई: कांदिवली पुर्वकडील ठाकूर व्हिलेज सिंग इस्टेट येथील मुंबई विकास आराखडा १२० फूट डीपी रोडवरील बाधित घरे निष्कासित झाल्यानंतर आता रस्ता बांधणीसाठी लोकप्रतिनिधीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी शनिवारी सदर रस्त्याचे भूमीपूजन केले, तर दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीसुद्धा रस्त्याचे भूमिपूजन करून मोकळे झाले. या दोन्ही प्रकारामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई दिसून आले.
येथील १२० फूट डिपी रोड हा लोखंडवाला येथून थेट ठाकूर व्हिलेजला जोडण्यात आला आहे. महिंद्रा कंपनीतून निघालेला रस्त्याचा भाग हा कांदिवली पुर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या विधानसभेत येतो.
तर निष्कासित झालेली घरे आणि रस्त्याचा शेवट हा मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विधानसभेत येतो. यामुळे कुठल्याही परिस्थिती या रोडचे श्रेय इतर आपल्याला मिळावे, यासाठी दोन्ही पक्षातील आमदारांकडून भूमिपूजनासाठी घाई करण्यात आली. आमदार भातखळक यांनी रविवारी भूमिपूजन करण्याचे जाहिर केल्यानंतर आमदार सुर्वे यांनी शनिवारी निष्कासित झालेल्या घरांच्या जागेवर भूमिपूजन करून मोकळे झाले.
मुलभूत सुविधाकडे दुर्लक्ष :-
सदर रस्त्याचे दोन्ही लोकप्रतिनिधीनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला अंधारात ठेवून दोन्ही लोकप्रतिनिधीनी परस्पर भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. तसेच निष्कासित केलेल्या घरांच्या जागेवर ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. या न सोडविता भूमिपूजन केले. परिणामी पावसाळ्यात ड्रेनेज लाईन व गटारीमुळे नागरिकांना त्रास होईल. याकडे लक्ष न देता, आपल्याला सदर कामाचे श्रेय कसे मिळेल, एवढ्यासाठीचं भातखळकर आणि सुर्वे यांनी भूमिपूजनाचा खटाटोप केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.
यांना होणार फायदा :-
या १२० फूट डिपी रोडचा सर्वाधित फायदा कांदिवली पुर्व विधानसभा मतदार संघातील लोखंडवाला, म्हाडा वसाहत, क्रांतीनगर, हनुमाननगर यांना होणार आहे. कारण त्यांना बोरिवली, दहिसर आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी आता आकुर्ली रोडकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामुळे कांदिवली पुर्व विधानसभा मतदार संघातील नागरिकांना सदर रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर रस्ता सुरू होण्यासाठी मी सभागृहात वेळोवेळी विषय घेतला. याचे संपुर्ण श्रेय हे लोखंडवाला रहिवासी आणि भारतीय जनता पार्टीला जाते. प्रकाश सुर्वे यांचा याविषयी काहीच सबंध नाही. त्यांनी भूमिपूजनाचे नाटक केले.आमदार अतुल भातखळकर, भाजपा
आमदार भातखळरांचा हा मतदार संघ नाही, दुसऱ्यांच्या मतदार संघात अशाप्रकारे भूमिपूजन करणे योग्य नाही. आणि मला श्रेयवाद भातखळरांनी शिकवू नये, लोकांना घरे देण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. तेव्हा कुठे रस्त्याचा मार्ग मोकळा झाला. हे भातखळकरांना माहिती आहे?आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना