कांदिवली : कांदिवली पश्चिम ते चारकोप महात्मा गांधी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य मार्गांवर अनेक बस थांबे आहेत. बहुतांशी बस थांब्यांच्या बाजूला अदानी इलेक्ट्रिकसिटी व्यवस्थापनाच्या केबल्स अस्ताव्यस्त, चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्या आहेत. याचा नाहक त्रास दररोज प्रवास करणाऱ्या हजारो, बस प्रवाशांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेले वर्षभर या केबल्सकडे अदानी व्यवस्थापनाचे अधिकारी, बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
कांदिवली पश्चिमेला प्रचंड लोकवस्ती असून स्लम, म्हाडा तसेच माथाडी कामगारांची फार मोठी वसाहत आहे. यामुळे बस प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. बहुतेक मार्गांचे काँक्रिटीकरण सुरु असल्याने, अदानी व्यवस्थापनाने बहुतांशी ठिकाणी नव्याने केबल्स टाकल्या, तसेच इलेक्ट्रिक केबल्स बॉक्स बदलले. मात्र वाढीव केबल्स आणि काही केबल्स तशाच रस्त्यावर आणि उघड्यावर टाकून ठेवल्या आहेत.
गेले कित्येक महिने अदानी व्यवस्थापानाने कोणतेही सुधारित काम केले नाही. यामुळे वृक्षांच्या बुंध्यांशी, पदपथावर, मुख्य मार्गांवर आणि बस थांब्यांच्या आजूबाजूला असलेल्या केबल्समुळे प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना तसेच बेस्ट प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
अदानी व्यवस्थापनाने तातडीने रस्त्यावरील आणि पदपथांवरील अस्ताव्यस्त केबल्स काढून टाकव्यात. प्रवासी वा नागरिकांचा अपघात झाल्यास अदानी व्यवस्थापन जबाबदार राहील. बेस्ट व्यवस्थापानाने देखील याकडे लक्ष द्यावे.आशिष पाटील, सामाजिक कार्यकर्ते