मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गाऊन वादात सापडलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी विनंती करतानाच कामराच्या वकिलांनी शिवसेना शिंदे गटाकडून धमक्या येत असल्याचे न्यायालयाला सांगितले.
धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्याची विनंती ज्येष्ठ वकील नवरोज सिरवाई यांनी केली. याची गंभीर दखल न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने घेत याचिकेची मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. मात्र, तातडीने अंतरिम संरक्षण देण्यास नकार देत कामराने संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी, असेही निर्देश दिले. अटकेच्या भीतीने कुणालने मद्रास उच्च न्यायालयाकडून 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घेतला होता. त्या जामिनाची मुदत सोमवारी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द कारण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली. मात्र, अटकेच्या कारवाईपासून तातडीने संरक्षण देण्यास नकार दिला. याचवेळी याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने मंगळवारी होणार्या सुनावणीवेळी न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.