मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाला लवकरच विकासक मिळण्याची आशा आहे. एएटीके कन्स्ट्रक्शन्स या कंपनीला पुनर्विकासाचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक 1 ते 15 या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरीत्या समूह पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबवला जाणार आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाच्या 34 एकर जागेवर 943 उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे 6 हजार 625 निवासी व 1 हजार 376 अनिवासी असे एकूण 8 हजार 1 भाडेकरू वास्तव्यास असून 800 जमीन मालक आहेत.
या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे क्षेत्रफळ सुमारे 73,144.84 चौरस मीटर आहे. इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाला 44 हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. अनेकवेळा मुदतवाढ देऊनही या प्रकल्पासाठी निविदा भरल्या जात नव्हत्या. मात्र आता निविदा प्रक्रिया पार पडली आहे.
निविदा प्रक्रियेतून एएटीके कन्स्ट्रक्शन्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यांना पुनर्विकासाचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव म्हाडाने तयार केला असून तो राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल.