Kalyan Local Train Accident Pudhari
मुंबई

Kalyan Local Train Accident: बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू; कल्याणजवळ हृदयद्रावक घटना

मुंब्रा–कळवा दरम्यान गर्दीत तोल गेला; डोंबिवलीतील 18 वर्षीय सोहम कटरेचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : बारावीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजीचा पेपर देण्यासाठी जात असताना धावत्या लोकलमधून पडून सोहम सचिन कटरे (18, रा. कोपर, डोंबिवली) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी मुंब्रा आणि कळवा स्थानकांच्या दरम्यान घडली.

सोहमने मंगळवारी सकाळी 9.15च्या सुमारास लोकल पकडली. त्याचे परीक्षा केंद्र कळवा मनीषा नगर येथील मनीषा विद्यालय होते.

मुंब्रा आणि कळवा स्थानकांच्या दरम्यान लोकलमध्ये अलोट गर्दीमुळे त्याचा तोल गेला व तो धावत्या लोकलमधून खाली कोसळला. त्यात सोहमचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सोहमला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोहम हा आजदे गाव, डोंबिवली येथे राहत होता व तो मूळचा सातारा जिल्ह्यातील कलेढोण मु. पो. पाचवड कठरे येथील रहिवासी होता. उज्ज्वल भविष्याची उत्तरपत्रिका लिहिण्याचे स्वप्न पहात असतानाच सोहमवर काळाने झडप घातली. सोहमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT