former BJP MLA Narendra Pawar File Photo
मुंबई

Kalyan Narendra Pawar News: दारू पाजून शारीरिक अत्याचार.., भाजपच्या माजी आमदारावर तरूणीचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल

मदतीच्या बहाण्याने एका २४ वर्षीय विवाहित तरुणीला बोलावून तिच्यावर शस्त्राचा धाक दाखवत आणि दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kalyan former BJP MLA Narendra Pawar News:

मुंबई: मदतीच्या बहाण्याने कल्याणमधील एका २४ वर्षीय विवाहित तरुणीला बोलावून तिच्यावर शस्त्राचा धाक दाखवत आणि दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुरुवारी पहाटे पडघा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्राचा धाक दाखवला... दारू पाजली अन्...

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २२ वर्षांच्या पीडित विवाहित तरुणीचा पतीसोबत वाद सुरू होता. त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे आपल्या फार्महाऊसवर नेले. तेथे तिला शस्त्राचा धाक दाखवून व दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. रात्री दोन वाजता माजी आमदार पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील याने सुद्धा पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील याच्या घरच्या केअरटेकरने पीडितेला तिच्या घरी आणून सोडले.

व्हिडिओ व व्हॉट्सॲप चॅट... तरूणीची पडघा पोलिस ठाण्यात धाव

घाबरलेल्या तरुणीने १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचे व त्यासंबंधी आपल्याकडे व्हिडिओ व व्हॉट्सॲप चॅट असल्याचे दाखविले. त्यानंतर पीडित तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. "पोलिसांनी मला आता न्याय द्यावा, त्यांनी अशा पद्धतीने किती महिलांचे आयुष्य उध्वस्त केले असेल, त्यामुळे यांना कठोर शिक्षा द्यावी," अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की, पीडित तरुणीने माझ्या इंस्टाग्राम खात्यावर व मोबाईलवर संपर्क साधून मदत मागितली. मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली, ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिच्याजवळील व्हिडिओ व मोबाईलवरील चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पीडित तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी रात्री संपर्क साधल्यानंतर त्यांनी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

आरोपींना ४८ तासांत अटक करा : कांचन कुलकर्णी

पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून, शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. "ही घटना अत्यंत निंदनीय व काळिमा फासणारी असून, देशात आणि राज्यात 'लाडकी बहीण' म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल, तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी, तसेच स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. त्यांना ४८ तासांत अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करू," असा इशारा काँग्रेस नगरसेविका व गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT