Kalayana Clock Pudhari
मुंबई

Kalayana Clock: मंत्रालय आणि विधान भवनात उभारणार 'कालायन' यंत्र

भारतीय खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमातून तयार विज्ञानाधारित कालदर्शकासाठी १० लाख ९७ हजार ४०० रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रमाणवेळेसोबतच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा, ग्रहांची स्थिती व हालचाल, पंचांग, विविध दिनविशेष आदींची माहिती देणार्‍या 'कालायन (भारतीय कालदर्शक)' हे विज्ञानाधारित घड्याळ मंत्रालय आणि विधान भवनात बसविले जाणार आहे.

यासाठीच्या एकूण १० लाख ९७ हजार ४०० रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून तसा शासन निर्णय (जीआर) सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.

भारतीय खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या ‘कालायन’ (भारतीय कालदर्शक) या विज्ञानाधारित वेळदर्शक उपकरण असल्याचे सांस्कृतिक कार्यविभागाने आपल्या जीआरमध्ये नमूद केले आहे.

एका कालायन उपकरणाची किंमत ५ लाख ४८ हजार ७०० रुपये आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने मंत्रालय आणि विधान भवनासह संचालनालयाच्या अखत्यारितील १४ वस्तुसंग्रहालयांमध्ये कालायन उपकरण बसविण्याचा प्रस्ताव दिला होता.

मात्र, सरकारने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मंत्रालय आणि विधान भवन येथे दोन उपकरणे बसविण्यास मान्यता दिली आहे. ‘कालायन’ हे केवळ वेळ दाखविणारे घड्याळ नसून भारतीय खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेले विज्ञानाधारित यंत्र असल्याचे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यात, प्रमाण वेळ व जीपीएस वेळ, सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ, ग्रहांची स्थिती व हालचाल, पंचांग, विविध दिनविशेष तसेच महत्त्वाच्या कालखंडांची माहिती प्रदर्शित करण्याची सुविधा आहे. याशिवाय भारतीय सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय घटनांची माहितीही त्याद्वारे प्रदर्शित करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT