मुंबई : काळा घोडा परिसर विकासाच्या दुसर्या टप्प्याला मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. यात पाच रस्त्यांचे नूतनीकरण, नागरिकांसाठी प्लाझा व पार्किंगसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासाचे कामही आता अंतिम टप्प्यात असून दुसर्या टप्प्यातील कामे हाती घेतली आहेत. या प्रकल्पासाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून लवकरच काळा घोडा परिसराचा कायापालट होणार आहे.
काळा घोडा येथे येणार्या पर्यटकांना आपली वाहने उभी करण्यासाठी पुरेशी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रिदम हाऊसच्या बाहेरील रस्त्याचे (के. दुबाश रोडचा भाग) प्लाझामध्ये रूपांतर केले जाईल आणि जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरील रस्ता दुतर्फा असणार आहे. प्लाझाच्या फ्लोअरिंग आणि डिझाइनसाठी बेसाल्ट नॅचरल फिनिश स्टोन, बेसाल्ट लेदर फिनिश स्टोन, मरून ग्रॅनाइट स्टोन आणि यलो ग्रॅनाइट स्टोन आदी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, प्लाझाचे लँडस्केपिंग बकुल ट्री, व्हेरिगेटेड पेंडनस, हेलिकोनिया सिट्टाकोरम, पर्पल हार्ट आणि गोल्डन ड्युरंटे सारख्या झाडांनी करण्यात येणार आहे.
टप्पा एक अंतर्गत व्ही. बी. गांधी मार्ग, रुदरफील्ड स्ट्रीट, रोप वॉक लेन, साईबाबा रोड आणि बी भरुचा रोड येथे काम सुरू आहे. टप्पा दोन अंतर्गत महात्मा गांधी रोड, के. दुबाश रोड, नागिंददास रोड, चेंबर ऑफ कॉमर्स लेन आणि फोर्ब्स स्ट्रीट या पाच रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
काळा घोडा परिसरातील रस्त्यालगत नवीन हेरिटेज पद्धतीचे दिवे बसवण्यात येणार आहेत. काळा घोडा हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि एलियाहू सिनेगॉग जवळ मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते मुंबईचे कला आणि सांस्कृतिक परिसर बनला आहे. काळा घोडा येथे वाहनमुक्त क्षेत्राची संकल्पना देखील राबविली जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.