Maharashtra Politics
मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असायला हवे, असे स्पष्ट करत आता मुंबईत ५ जुलै रोजी विजयी मेळाव्यात मराठी माणसाच्या एकजुटीचे दर्शन घडेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (दि. ३० जून) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट दिसून आली. शिवसेनेसोबत ज्या ज्या पक्षांनी पक्ष भेद विसरून एकत्र आले नसते तर हिंदी सक्तीची जीआर रद्द केला नसता. ५ जुलै रोजी मोर्चात अजित पवार गटातलेही सहभागी होणार होते.
प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीबाबत राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सरकारने अशी थट्टा करू नये शिक्षणाच्या समितीवर अर्थतज्ञ बसवला आहे, असा टोला लगावत आता सक्तीवर पुढे काहीही सरकारने करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी माणूस विखुरला आहे हे लक्षात आल्यावर मराठी द्रोही एकत्र आले. आता आम्ही त्यांचा फणा दाबला आहे. आता त्यांनी मराठी माणूस एकवटू नये म्हणून त्यांना जीआर रद्द करावा लागला, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी जे राजकीय पक्ष आमच्यासोबत आले, त्यांचे आम्ही कौतुक करतो. सरकारने संबंधित जीआर (शासन निर्णय) तात्पुरता रद्द केला असून, तो रद्द केला नसता तर ५ जुलै रोजी सरकारला मोठे आंदोलन पाहायला मिळाले असते. हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारने मागे घेतला आहे. आता आम्ही ५ जुलै रोजी विजयोत्सव साजरा करणार आहोत. मराठीद्वेष्ट्यांना आम्ही दणका दिला आहे आणि ही एकजूट यापुढेही अशीच कायम राहिली पाहिजे," असे आवाहनही उद्धव ठाकरे त्यांनी केले.