मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदारयादी वापरली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. या निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत वाघमारे बोलत होते.
मतदारसंख्या, मतदान केंद्रे, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदारयादी तयार केली जात नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदारयादी वापरली जाते. 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली यादी उपलब्धतेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढेल. मतदान केंद्रांच्या निश्चितीबद्दल राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष जारी केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी. त्याचबरोबर उपलब्ध मतदान यंत्रांचा अचूक आढावा घेण्यात यावा, असे निर्देश देतानाच पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही वाघमारे यांनी दिली.