Jogeshwari Trauma Care Hospital Pudhari
मुंबई

Jogeshwari Trauma Care Hospital: जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात; बालरोगतज्ज्ञ मद्यधुंद अवस्थेत

बालकाच्या पालकांना शिवीगाळ केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात ऑन-कॉल ड्युटीवरील एका बालरोगतज्ज्ञ मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्याने रुग्णाच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अधिष्ठात्यांनी संबंधित डॉक्टरांच्या निलंबनाची शिफारस केली असून चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ही चौकशी सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका दीड वर्षांच्या बालकाला जुलाबाच्या त्रासामुळे रुग्णालयाच्या अपघात विभागात आणण्यात आले होते. त्या वेळी बालरोगतज्ज्ञ उपस्थित नसल्याने सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑन-कॉल डॉक्टर कपिल जाधव यांच्याशी संपर्क साधला.

संबंधित डॉक्टर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी बालकाची तपासणी न करता उलट बालकाच्या आईशी तसेच परिचारिका आणि इतर डॉक्टरांशी अर्वाच्य भाषेत वाद घातल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर त्यांनी बालरोग विभागाच्या वॉर्डमध्ये जाऊनही नातेवाईकांशी वाद घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर तातडीने संबंधित डॉक्टरांचे रक्तनमुने तपासणीसाठी कलिना येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकाची तपासणी केली. मात्र घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी बालकाला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. संबंधित डॉक्टर हे लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील डीआरपी विद्यार्थी असून त्यांची तीन महिन्यांसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT