जोगेश्वरी : गैरसुविधांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर फायर एक्झिट जिन्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून त्याला दुर्गंधी येत होती. तीन दिवस हा मृतदेह पडून असण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता हा अपघाती मृत्यू असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, दुर्गंधी येईपर्यंत कोणालाही याबाबत काही कळाले नाही. यामुळे रुग्णलयाचा कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव मुर्तुझ शेख असे असून ते 16 सप्टेंबरला नोकरीसाठी झारखंडहून मुंबईत आले. ते गोरेगावमध्ये त्यांच्या मित्रांसोबत काम करत होते. 18 सप्टेंबरला तब्येत बिघडल्याने ते उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात आले होते. रुग्णालयात कोणता विभाग कुठे आहे याची त्यांना माहिती नव्हती. यामुळे ते रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर असलेल्या फायर एक्झिट जिन्याकडे गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फायर एक्झिटच्या जिन्यात मुर्तुझ चक्कर येऊन पाय घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या डोक्याला जिन्याचा कोपरा जोरात लागून गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले आहे.
ट्रॉमा केअर रुग्णालयातील फायर एक्झिट जिन्याचा भाग वापरात नाही. शेख नेमके त्याच भागात पडले होते. यामुळे कुणालाच याची कल्पना नव्हती. तब्बल तीन दिवस मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता. काहीतरी कुजल्यासारखा उग्र वास रुग्णालयात आलेल्यांना आला . त्यानंतर पाहणी केली असता जिन्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.