पूनम पाटगावे
गोरेगाव : जोगेश्वरी पूर्वेकडील राजेश्वर वामन रागिनवर, प्रताप नगर याठिकाणी असलेल्या हिंदू स्मशानभूमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. तुटलेल्या लाद्या, अस्पष्ट नामफलक आणि पावसाळ्यात पाणी गळती करणारी छपरं यामुळे येणार्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या लहानग्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलो तर पावसाळ्यात छपरातून पाणी गळते, साफसफाई कमी असल्यामुळे परिसर नेहमीच घाणेरडा दिसतो. सर्वात गंभीर बाब म्हणजे, एका वर्षाखालील बालकांच्या दफनासाठी येथे स्वतंत्र व पुरेशी जागा नाही. परिणामी पालकांना गोरेगाव, अंधेरी किंवा मरोळसारख्या दूरच्या स्मशानभूमींचा आधार घ्यावा लागतो. या समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आहे. सदर तक्रारीची दखल खा. रवींद्र वायकर यांनी घेतली असल्याचे समजते. नागरिकांची मागणी तातडीने लक्ष देण्यासारखी आहे. त्यांचा आग्रह आहे की, बालकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी,छप्पर पूर्णपणे झाकावे, जेणेकरून पावसाळ्यातील गळतीची समस्या कायमची दूर होईल. प्रतापनगर स्मशानभूमीची अवस्था सुधारली नाही, तर स्थानिकांमध्ये नाराजी अधिक वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या स्मशानभूमीचे दुर्दैव स्थानिकांना सतत त्रास देत आहे यामुळे प्रशासनाने याप्रकरणी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.