मुंबई : निवडणुकीसंदर्भात कागदपत्रे व अन्य कामे करण्यासह प्रचारासाठी मुंबईतील सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी भरती सुरू आहे. दररोज 500 ते 800 रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारांसह घरीच असलेल्या महिलांसाठी कमाईची मोठी संधी चालून आली आहे.
राजकीय पक्षांकडे पूर्वी कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा असायचा. विशेष म्हणजे कोणीही पैशाची ही अपेक्षा करत नव्हते. निवडणुकीच्या काळात दुपार व रात्रीचे जेवण पण नाश्त्याला वडापाव मिळाला तरी कार्यकर्ते खूश होत होते. मात्र, आता कार्यकर्तेच मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला भाडेतत्त्वावर कार्यकर्ते घ्यावे लागत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही अनेक उमेदवारांनी भाडोत्री कार्यकर्ते घेण्यास सुरुवात केली आहे. यात काही कार्यकर्ते ऑफिसमध्ये बसून कागदपत्रे जमा करण्यासह प्रचाराच्या विविध परवानगी घेणे, हिशेब ठेवणे व अन्य कामे करणार आहेत, तर काही कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष प्रचारात सामील व्हावे लागणार आहे. यासाठी पाचशे रुपये ते 800 रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे, तर महत्त्वाची कामे करणाऱ्या कार्यकर्त्याला हे मानधन प्रत्येक दिवशी एक हजार ते बाराशे रुपये इतके आहे.
शिवसेना ठाकरे गट भाजप व शिवसेना शिंदे गटाकडे काही प्रमाणात कार्यकर्ते असले तरी प्रचारासाठी कार्यकर्ते बाहेर फिरण्यासाठी तयार नसल्यामुळे कमी-जास्त प्रमाणात सर्वांनाच भाडोत्री कार्यकर्ते घ्यावे लागणार आहेत. सरासरी 50 ते 60 कार्यकर्ते प्रचाराचासह कामांसाठी लागणार असल्यामुळे संपूर्ण शहरांमध्ये 15 ते 20 हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. प्रचारासाठी महिलांचीही मोठी मागणी असल्यामुळे घर बसलेल्या महिलांना कमाईची संधी मिळणार आहे. दोन वेळचे जेवण व नाश्ताही भाडोत्री कार्यकर्त्यांना केवळ मानधनच नाही तर दोन वेळचे जेवण व सकाळचा नाश्ता, चहा बिस्किटे, पाणी बॉटल आदी देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजचा खर्च सरासरी 15 ते 20 हजारांपेक्षा जास्त होणार आहे.