2024 मध्ये तब्बल 7.6 लाख भारतीय विद्यार्थ्यांनी जगभरातील विविध देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले, असे इमिग्रेशन ब्यूरोने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 2023 च्या तुलनेत हा आकडा थोडासा घसरला असला, तरी आंतरराष्ट्रीय शिक्षण व नोकरीसाठी भारतीय विद्यार्थ्यांची वाढती ओढ आणि जगभरातील संधी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा कायम आहे. एसटीईएम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिझनेस आणि नवउत्पन्न तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत.
या देशांना पसंती
अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया, उझबेकिस्तान यांसारख्या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आवड वाढली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक संधी आणि नेटवर्किंग यामुळे परदेशातील शिक्षणाचा अनुभव केवळ ज्ञानासाठीच न राहता कारकीर्द गाठण्यासाठीही महत्त्वाचा झाला आहे.
7.6 लाख
ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 7.6 लाख भारतीय विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षणासाठी गेले, तर 2023 मध्ये हा आकडा 8.95 लाखांवर होता. ही थोडीशी घसरण असली, तरी गेल्या पाच वर्षांतील एकूण संख्या मोठी वाढ दर्शवते.
मुंबई, पुणे, नागपूरमधील विद्यार्थी
जागतिक दर्जाचे शिक्षण आणि उत्तम करिअरच्या संधींमुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशाचा मार्ग धरला आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांपासून ते अगदी लहान शहरांपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये परदेशी शिक्षणाचे आकर्षण वाढले आहे.