Jio Platforms IPO Pudhari
मुंबई

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओने रचला जागतिक इतिहास; १ कोटीहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा पहिला आयपीओ

अधिकृत आकडेवारीनुसार विक्रमी प्रतिसाद; एक कोटीहून अधिक अर्ज मिळवणारा जगातील पहिला IPO ठरल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारतीय भांडवली बाजारात विक्रमांचे नवे शिखर गाठत ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगची (आयपीओ) यशस्वी सांगता झाली आहे.

बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या आयपीओला देशभरातून तब्बल १ कोटी ३८ लाखांहून (१३.८ दशलक्ष) अधिक अर्ज प्राप्त झाले असून, संपूर्ण इश्यू २२ पटींहून अधिक सबस्क्राईब झाला आहे. जागतिक पातळीवर कोणत्याही समभाग विक्रीत १ कोटीहून अधिक अर्ज मिळवणारा हा जगातील पहिलाच आयपीओ ठरला आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या या विक्रमी प्रतिसादाने मागील सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम मोडीत काढले. यापूर्वी सर्वाधिक ९७ लाख अर्जांचा विक्रम नोंदवणाऱ्या ‘वारी एनर्जीज’ला जिओने सहज मागे टाकले. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स आणि बीसीसीएल या कंपन्यांच्या (सुमारे ९० लाख अर्ज) विक्रमांनाही मागे टाकले आहे.

सुमारे ₹३०,१८८ कोटींच्या या ऐतिहासिक समभाग विक्रीसाठी अँकर गुंतवणूकदारांसह एकूण बोलीचे मूल्य ₹७ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. यामध्ये किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांकडून १ कोटीपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले. संस्थात्मक गुंतवणूकदार आणि हाय-नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्स या दोन्ही श्रेणींमध्ये गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

हा प्रचंड प्रतिसाद म्हणजे उद्योगपती दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या संपत्तीनिर्मितीच्या वारशाचा आणि मुकेश अंबानी यांच्या ‘संपत्तीचे लोकशाहीकरण’ करण्याच्या दूरदृष्टीचा प्रत्यय मानला जात आहे. शेअर्सचे वाटप (अलॉटमेंट) २६ ऑक्टोबर रोजी पूर्ण होण्याची शक्यता असून, २८ ऑक्टोबर रोजी जिओचे शेअर्स शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्ट) होणार आहेत.

ठळक मुद्दे...

१.३८ कोटी अर्ज : जगभरात १ कोटीपेक्षा जास्त अर्ज मिळवणारा इतिहासातील पहिलाच आयपीओ.

२२ पट सबस्क्रिप्शन : एकूण इश्यू २२ पट, तर रिटेल आणि संस्थात्मक श्रेणीत प्रचंड मागणी.

७ लाख कोटींची मागणी : अँकर आणि मुख्य बोली मिळून विक्रमी मूल्य गाठले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT