मुंबई: भारत-पाकिस्तान फाळणीच्या हालचाली सुरू असताना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्या ढासळत्या प्रकृतीचे गुपित कायम ठेवल्याबद्दल मुंबईच्या दोन पारसी डॉक्टरांना ‘निशान-ए-कायदे आझम’ हा आपला सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
१९४७ साली फाळणी होण्याच्या मार्गावर असताना जीनांची प्रकृती कमालीची ढासळली होती आणि ही खबर कोणत्याही परिस्थितीत बाहेर कळू द्यायची नव्हती. तसे झाले असते तर कदाचित फाळणीचा एकूण क्रम आणि मुहूर्तही बदलला असता, असे आजही इतिहास तज्ज्ञांना वाटते.
त्यामुळे फाळणीच्या काळात जीनांच्या प्रकृतीचे गुपित अभेद्य राखणे महत्त्वाचे होते आणि ती जबाबदारी मुंबईच्या दोन पारसी डॉक्टरांनी अखेरपर्यंत पार पाडली. त्याबद्दल डॉ. जाल रतनजी पटेल आणि डॉ. जाल धायभो-कू या दोघांना ‘निशान-ए-कायदे आझम’ हा सर्वोच्च किताब देण्यात येत असल्याचे पाकिस्तानचे नियोजन विकास मंत्री एहसान इक्बाल यांनी एक्स सोशल मीडियावर जाहीर केले.
कायदे आझम मोहम्मद अली जीना यांच्या आजारपणाचा तपशील आतल्या गोटातील व्यक्तींच्या पलीकडे या डॉक्टरांनी जावू दिला नाही आणि हे गुपित राखून त्यांनी पाकिस्तानची असामान्य सेवा केली व आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला, असे हे मंत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
भारतीय उपखंडाची फाळणी आणि त्यातून पाकिस्तानची निर्मिती घडवणाऱ्या बॅरिस्टर जीनांना १९३० मध्येच क्षयरोगाची बाधा झाली. तेव्हा हा रोग असाध्य होता. त्यावर कोणताही उपचार नव्हता.
परिणामी, जीनांची प्रकृती उत्तरोत्तर ढासळत गेली. १९३८ पासून तर ते नियमित आजारी पडू लागले. ते सतत अशक्तपणाच्या तक्रारी करत, तरीही त्यांचे आजारपण अखेरपर्यंत गुप्त राखले गेले. त्यांच्या भगिनी फातिमा जीना यांच्यासह काहीच निकटवर्तीयांना जीनांच्या आजारपणाची कल्पना होती.
बॅरिस्टर जीना हे सतत सिगारेट ओढायचे. एक विझली की दुसरी पेटवायचे इतके जालीम व्यसन त्यांना जडले होते की दिवसाला किमान ५० सिगारेटी ते फुंकत. जोडीला क्युबन सिगारही ओढत. १९४६ मध्ये मुंबईतील डॉक्टर जाल रतनजी पटेल आणि डॉक्टर जाल धायभो-कू यांनी एक्सरे तपासून जीनांचा क्षय रोग प्रचंड बळावल्याचे निदान केले.
ते फार तर एक-दोन वर्षे जगतील, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. मात्र, जीनांची ही मरणासन्न अवस्था दोन्ही डॉक्टरांनी जगाला कळू दिली नाही. त्यांचा आजार जगाला कळला आणि त्यांच्या हाती उणीपुरी एक-दोन वर्षे असल्याचे समजले तर राजकारणात असलेला त्यांचा दबदबा खतम होऊन जाईल याची पूर्ण जाणीव दोघा डॉक्टरांना होती. दोघांनीही आपल्या वैद्यकीय धर्माशी इमान राखले आणि जीनांवर शक्य तितके उपचार करत त्यांचे आजारपणाचे गुपितही जपले.
१४ ऑगस्ट १९४७ ला आधी पाकिस्तानची निर्मिती झाली. दुसऱ्या दिवशी भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर वर्षभराने ११ सप्टेंबर १९४८ रोजी बॅ. जीनांचा फुफ्फुसाच्या क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यानंतर ७८ वर्षांनी बॅ. जीनांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर जाल रतनजी पटेल आणि डॉक्टर जाल धायभो-कू या दोन्ही डॉक्टरांना सर्वोच्च किताब देण्याची आठवण पाकिस्तानला झाली. मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या सन्मान सोहळा दोन्ही डॉक्टरांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असल्याचे समजते.