मुंबई : अंधेरीतील एका नामांकित बँकेच्या लॉकरमधून एका व्यावसायिकाचे सुमारे 36 लाखांच्या सोन्याचे दागिन्यांसह इतर मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आली होती. मात्र ग्राहकाला बँकेकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आता डी. एन. नगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारीत चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत 36 लाख रुपये असली तरी आजची किंमत सुमारे ऐंशी लाख रुपये असल्याचे बोलले जाते. यातील तक्रारदार अंधेरीतील रहिवाशी असून त्यांचा स्वत:चा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. पूर्वी ते जुहूच्या गुलमोहर रोड परिसरात राहत होते. यावेळी त्यांनी जुहू-वर्सोवा रोडवर असलेल्या एका नामांकित बँकेत खाते उघडले होते. ते बँकेचे जुने ग्राहक असल्याने त्यांना बँकेच्या वतीने एक लॉकर सुविधा मोफत देण्यात आली होती.
याच लॉकरमध्ये त्यांनी घरातील विविध सोन्याचे, हिऱ्यांचे, चांदीचे दागिने, सोन्याचे नाणी, बिस्कीटसह इतर महत्त्वाचे दस्तावेज सुरक्षित ठेवले होते. 4 सप्टेंबर 2023 रोजी ते बँकेत लॉकर उघडण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना लॉकरमधील विविध सोन्याचे दागिने, नाणी, बिस्कीट आणि रत्नजडीत सोन्याचे पेडंट असा सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.