मुंबई : अभियांत्रिकी क्षेत्रात आयआयटीसह इतर राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य म्हणजेच जेईई-मेन्स २०२६मध्ये जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
देशातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष असलेल्या जेईई-मेन्सच्या परीक्षेचे वेळापत्रक एनटीएने जाहीर केले. या वेळापत्रकानुसार ही परीक्षा जानेवारी २०२६ आणि एप्रिल २०२६ अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया अद्यापही सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. तो दूर करत जेईई-मेन्स २०२६ च्या पहिल्या सत्रातील जानेवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे संकेत एनटीएने दिले आहेत.
ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विद्यार्थांनी आवश्यक कागदपत्रे सज्ज ठेवावी, असा सल्ला एनटीएने दिला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी जेईई-मेन्स २०२६ साठी अर्ज करण्यापूर्वी आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख (दहावीच्या प्रमाण-पत्रानुसार), नवीन छायाचित्र, पत्ता आणि वडिलांचे नाव अद्ययावत करून ठेवावे. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या यूडीआयडी कार्ड वैधता तपासून घ्यावी. त्याचे आवश्यकतेनुसार अद्ययावतीकरण किंवा नूतनीकरण करून घ्यावे.
परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठीची आवश्यक लिंक https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही एनटीएकडून जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा - २०२६ संदर्भातील अधिक माहिती आणि सूचनांसाठी नियमितपणे एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ www.nta.ac.in आणि https://jeemain.nta.nic.in/ ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.