Jayant Patil Resignation NCP Sharad Pawar Faction
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते व शरद पवार यांच्याकडे पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडे देण्याची विनंती त्यांनी केली होती. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदावर शशिकांत शिंदे यांची निवड होणार आहे. ते मंगळवारी (दि.१५) पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील पक्षातील मोठे नेते होते. ते सांगलीच्या वाळवा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने सलग निवडून येत आहेत. शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा राजीनामा मागे घेण्याची विनंती पाटील यांनी केली होती. तुमच्या नावावर केवळ आम्ही राजकारण करत आलो आहोत,असे सांगताना पाटील भावूक झाले होते.
दरम्यान, ते काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पदावर कायम राहण्यास सांगितले होते. पण त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांची पक्षात एकाधिकारीशाही आहे. ते एकटेच निर्णय घेतात. तरुणांना निर्णय प्रक्रियेत घेत नाहीत, असा नाराजीचा सूर निघू लागला होता. पक्षाचे आमदार रोहित पवार यांचाही पाटील यांच्या नेतृत्वाला छुपा विरोध होता. पक्षाच्या राज्य नेतृत्वपदी आक्रमक चेहरा देण्याची मागणी त्यांच्याकडून आणि त्यांच्या सर्मथकांकडून होऊ लागली होती. अखेर पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार आहे. ते मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
शरद पवार यांच्या आज पर्यंतच्या राजकारणाचा सातारा केंद्रबिंदू राहिला आहे. सातरा जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे माजी आमदार असलेले शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाची धुरा शरद पवार यांनी दिल्याचे मानले जात आहे. शिंदे यांची आक्रमक नेता अशी ओळख आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना साताऱ्यातून खासदारकीची उमेदवारी देण्य़ात आली होती. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिली होती. त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, पक्षाचे राज्य प्रमुख म्हणून पक्षातील घडामोडींवर आमची जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. परंतु, प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणाच्या नावाची चर्चा झाली नव्हती, असे शशिकांत शिंदे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितले.