Jayant Patil file photo
मुंबई

Jayant Patil : पडळकरांनी बोलताना भान राखावे

आ. जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टीकेमुळे मुख्यमंत्र्यांंचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीस यांनी पडळकरांना बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याची माहिती देताना पडळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करू आणि यापुढे बोलताना काळजी घेऊ.

पडळकर यांनी जत (जि. सांगली) येथे एका मोर्चासमोर बोलताना जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबीयांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यासंबंधीचा एक व्हिडीओ समाज माध्यमात सामायिक झाला आहे. पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, पडळकर यांनी जे स्टेटमेंट केले ते योग्य आहे, असे माझे मत नाही. कुणाच्याही वडिलांविषयी किंवा परिवाराविषयी असे बोलणे योग्य नाही. यासंदर्भात माझी पडळकरांशी चर्चा झाली. त्यांनाही मी सांगितले, मला शरद पवारांचाही फोन आला होता. त्यांच्याशीही मी संवाद साधला. अशाप्रकारच्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही.

मुख्यमंत्री म्हणतात, भविष्यात मोठी संधी, पण....

पडळकर एक तरुण नेते आहेत. आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकपणा दाखवताना बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना सांगितले आहे की, हे लक्षात घेऊनच आक्रमकपणा राखला पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील, हे लक्षात घेऊन आपण बोलले पाहिजे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नोंदवला निषेध

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट फोन करून पडळकर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. अशाप्रकारची पातळी सोडून केलेली टीका योग्य नाही, असे ते फडणवीसांना म्हणाले.

महाराष्ट्राच्या परंपरेचा अवमान : सतेज पाटील

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पडळकरांचे विधान हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अवमान असल्याचा आरोप केला आहे. पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे, असे ते म्हणाले.

कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो

शरद पवार गटाने पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरील विधानाचा निषेध एका कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो बांधून नोंदवला आहे. पक्षाचे दक्षिण मुंबई युवक अध्यक्ष संतोष पवार यांनी हा आगळावेगळा निषेध नोंदवला. संतोष पवार हे एक श्वान पक्ष कार्यालयासमोर घेऊन आले होते. या श्वानाच्या गळ्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटो लावला होता. पोलिसांनी हा फोटो जप्त केला.

जयंत पाटील यांचा भाष्य करण्यास नकार

पडळकर यांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत असताना जयंत पाटील यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. मी याप्रकरणी काहीही बोलणार नाही. जे काही चाललंय ते तुम्हीच बघा, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT