मुंबई: राज्यातील वाढीव वीजबिले, थकीत दंड आणि स्मार्ट मीटर प्रकल्प स्थगित करण्याची मागणी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जयंत पाटील यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात ते म्हणतात की, प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर वाढीव वीजबिले व त्यासोबत आकारण्यात आलेला थकीत दंड यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
गोवा राज्यात याच गंभीर समस्येची दखल घेत तेथील मुख्यमंत्र्यांनी जनहितार्थ स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला तात्पुरता ब्रेक लावला आहे, तसेच वाढीव बिलांची आणि अन्यायी दंडाची प्रकरणनिहाय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीचा दिलासादायक निर्णय घेण्याची अत्यंत गरज आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवल्यापासून ग्राहकांना अचानक त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेरची आणि प्रचंड वाढीव बिले येत आहेत. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता मागील कालावधीचा अवाढव्य दंड आकारला जात आहे.
अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे जुने मीटर बंद किंवा संथ गतीने चालत होते, ही वीज खात्याची चूक आणि प्रशासकीय दुर्लक्ष असताना त्याचा संपूर्ण आर्थिक भार आता एकाच वेळी दंडाच्या स्वरूपात सर्वसामान्य ग्राहकांवर टाकला जात आहे, याकडेही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.