काही सेकंदांच्या फरकाने हुकली जय जवानची संधी pudhari photo
मुंबई

Pro Govinda League : काही सेकंदांच्या फरकाने हुकली जय जवानची संधी

नोंदणी प्रक्रियेतील विलंब महागात; प्रो-गोविंदा लीग आयोजकांचा निर्णय मान्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रो-गोविंदा लीगचे दोन वेळचे विजेता असलेले जोगेश्वरीतील प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकाला यावर्षी स्पर्धेबाहेर राहावे लागले आहे. ऑनलाईन नोंदणी दिलेल्या वेळेपेक्षा काही सेकंदाच्या फरकाने करणे त्यांना महागात पडले आहे. दरम्यान, निर्णय प्रक्रियेचा आदर राखत आयोजकांचा निर्णय मान्य आहे. आम्ही आत्मपरीक्षण करू, असे जय जवान गोविंदा पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी सांगितले.

प्रो-गोविंदा लीग स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वाच्या नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातून एकूण 127 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या नियमानुसार सर्वप्रथम नोंदणी करणार्‍या 32 संघांना स्पर्धेत स्थान स्थान दिले जाणार होते. जय जवान गोविंदा पथक हे नोंदणी प्रक्रियेत 41 व्या स्थानी होते.

जय जवान गोविंदा पथकाचे व्यवस्थापक विजय निकम यांनी सांगितले की, प्रो- गोविंदा लीगच्या तिसर्‍या पर्वासाठी 10 जून ते 14 जून 2025 या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम 32 संघांची यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित होते. 10 जून रोजी सायंकाळी 6 वाजता नोंदणीची लिंक सुरू होणार होती, मात्र दुपारी 12 वाजताच नोंदणी प्रकियेला सुरुवात झाली.

आम्ही सर्व खबरदारी घेऊन नोंदणी करीत होतो. मात्र, संकेतस्थळ संथगतीने सुरू होते. तरीही 12 वाजून 4 मिनिटांनी आमची नोंदणी पूर्ण झाली. त्यानंतर 14 जूननंतर प्रसिद्ध होणारी अंतिम 32 संघांची यादी 12 जूनलाच प्रसिद्ध झाली. तेव्हा 31 व 32 व्या क्रमांकावरील गोविंदा पथकाची नोंदणीची वेळही 12 वाजून 4 मिनिटे होती, मात्र आम्हाला संधी देण्यात आली नाही. परिणामी, आमच्या तीन महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. मात्र, जय जवान गोविंदा पथकाचा वरळीतील 5 जुलैच्या मराठी भाषेसंबंधित विजयी मेळाव्यामध्ये सहभाग आणि प्रो-गोविंदा लीगच्या स्पर्धेतून बाहेर पडणे, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही

आयोजकांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकारण करून आयोजकांनी जय जवान गोविंदा पथकाला बाद केले, या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. जय जवान गोविंदा पथक हे नोंदणी प्रक्रियेत 41 व्या स्थानी होते. तसेच गतवर्षी दुसर्‍या क्रमांकावर असलेले बालवीर गोविंदा पथक नोंदणी प्रक्रियेत 37 व्या क्रमांकावर होते. आम्ही दुपारी 12.04 वाजता नोंदणी केली असा जय जवान पथकाचा दावा आहे. मात्र, खोपटचा राजा आणि नूतन बालवाडी पथकाचीही नोंदणीची वेळही 12.04 वाजताची आहे. जय जवान पथक काही सेकंदांनी मागे पडले.

प्रो-गोविंदा लीग स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वामध्ये सहभागी होता न आल्याचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. सर्वकाही विसरून आता सार्वजनिक दहीहंडी उत्सवाकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. सर्वाधिक थर लावण्याचा विक्रम आम्ही यापूर्वी केला आहे. तरीही, यंदा आम्ही किती थर लावतो, याची उत्सुकता सर्वांना आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू.
संदीप ढवळे, अध्यक्ष, जय जवान गोविंदा पथकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT