ढाक्कुमाकुम... गोविंदा रे गोपाळा...! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष  file photo
मुंबई

ढाक्कुमाकुम... गोविंदा रे गोपाळा...! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

Dahi Handi 2024 | दिवसभर रंगणार गोविंदा पथकांचा थरथराट

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीनंतर दहीहंडी उत्सवावाचे साऱ्यांनाच वेध लागलेले असते. आज लेझर लाईटचा झगमगटात आणि साऊंड सिस्टीमचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात दहीहंडीचा उत्सव न्हाऊन निघत आहे. राज्यासह देशभरात दिवसभर थरांचा थरार रंगणार असून सर्वत्र दहीहंडी उत्सवावाचा जल्लोष सुरू आहे.

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. गोविंदा पथकांकडून रचल्या जाणाऱ्या थरांवर थरांना विधानसभा निवडणुकीचाही एक थर जोडला गेला असल्याने या उत्सवात कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची उधळण होणार आणि त्यासाठी जिवाची बाजी लावणारे चित्तथरारक पराक्रम गोविंदा करून दाखवतील. आज ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या मुंबई महानगरप्रदेशात खासगी, सार्वजनिक आणि लहान मंडळांच्या सुमारे दोन तीन हजारांच्या घरांत दहीहंड्या लागणार आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील ताडवाडी गोविंदा पथक व जोगेश्वरी जय जवान पथकासह मोठी गोविंदा पथके उंचच्या उंच थर लावून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राज्यातल्या सत्ताकारणाची झळ गेल्या वर्षापासून दहीहंडी उत्सवाला बसली असून, गोविंदा पथके आणि राजकीय आयोजकही विभागले गेले आहेत. उच्च न्यायालयाने या उत्सवावर घातलेल्या कडक निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सवातून काही मोठे राजकीय आयोजक बाहेर पडले आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांचा या उत्सवातील शिरकाव गेल्या २ वर्षांत वाढला आणि बक्षिसांची लयलूट सुरू आहे.

बदलापुरात उत्सव नाही

बदलापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणात डीजे ऑपरेटर यांनी सुद्धा साउंड सिस्टम आणि डीजे उत्सवासाठी देण्यास नकार देऊन संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. बदलापूरवरून तापलेल्या राजकारणात मनसेने केवळ बदलापुरातच नाही तर डोंबिवलीतही यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका गोविंदा पथकाचा खर्च ५ लाख रुपये

एका गोविंदा पथकामध्ये सरासरी २०० ते २५० गोविंदा असतात. या सर्वांना टी-शर्ट वाटप करण्यासह दिवसभर त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय, प्रवासासाठी वाहने, वैद्यकीय किट, याचा खर्च सुमारे ५ लाख रुपयांच्या घरात जातो.

उत्सवाच्या आयोजनाचा खर्च १० लाख ते २ कोटी

दहीहंडी आयोजनाचा खर्च सुमारे १० लाख रुपये ते २ कोटी रुपयेपर्यंत येतो. काही राजकीय पक्ष हा खर्च ५ ते ६ कोटी पेक्षा जास्त असल्याचे सांगतात. त्यात बक्षिसांसह डीजे, स्टेज व रोषणाई, खानपान, सेलिब्रिटींचे मानधन, ऑर्केस्ट्रा व अन्य खर्चाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT