Mumbai Sextortion Case Pudhari
मुंबई

Mumbai Crime: खाजगी चॅट्स... महिला क्रिकेटपटूने व्यावसायिकाला दिल्या धमक्या; 63 लाख उकळले, सेक्सटॉर्शन प्रकरणात अटक

Mumbai Sextortion Case: मुंबई गुन्हे शाखेने सेक्सटॉर्शन प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील महिला क्रिकेटपटूसह तिघांना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Sextortion Case: मुंबईत एका धक्कादायक सेक्सटॉर्शन प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, जम्मू-काश्मीर टी-20 लीगशी संबंधित महिला क्रिकेटपटूसह तिचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात एका व्यावसायिकाला प्रेमसंबंध आणि खासगी चॅट्सच्या जाळ्यात अडकवून तब्बल लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फरखंदा अझीझ खान हिचा समावेश आहे. तिच्यासोबत तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि साथीदार उद्दीन इम्तियाज वानी यांनाही अटक करण्यात आली आहे. फरखंदा आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले, तर वानीला जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा कुलाबा परिसरात राहणारा 28 वर्षीय व्यावसायिक आहे. 2024 मध्ये त्याची ओळख फरखंदा खानशी झाली होती. सुरुवातीला मोबाईल चॅटिंगमधून दोघांमध्ये मैत्री वाढली. त्यानंतर आरोपी महिलेने त्याच्यासोबत अश्लील आणि खासगी स्वरूपाच्या गप्पा सुरू केल्याचा आरोप आहे.

यानंतर फरखंदाने तिचा भाऊ आणि साथीदाराची ओळख त्या व्यावसायिकाशी करून दिली. काही काळानंतर तिने आर्थिक अडचणींचे कारण सांगत पैशांची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला खासगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली.

या दबावाखाली तक्रारदाराने एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत 32 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे सुमारे 23.61 लाख रुपये फरखंदाच्या खात्यात जमा केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. या पैशांपैकी मोठी रक्कम आरोपी इम्तियाज वानीच्या खात्यात वळवण्यात आली होती. काही व्यवहार फरखंदाच्या वडिलांच्या खात्यातही जमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याचदरम्यान आरोपींनी तक्रारदाराला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे खासगी चॅट्सचे स्क्रीनशॉट असल्याचा दावा करत, हे सर्व उघड करुन तुरुंगात टाकण्याची धमकी दिली गेली. या भीतीपोटी तक्रारदाराने जानेवारी 2026 मध्ये आणखी 40 लाख रुपये आरोपींना दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मुंबईच्या पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच आयटी कायद्यानुसार आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT