मुंबई

महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे परत मिळणार

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे परत मिळणार आहेत.

जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने शनिवारी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात शनिवारी मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अ अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य सरकार राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा संकल्प मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या चर्चेच्यावेळी ब्रिटीश उच्चायुक्तालयातील राजकीय विभागविषयक उपप्रमुख इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या. मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT