मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. ठिकठिकाणी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. मुंबईतील लालबागचा राजा हे तर भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक मानलं आहे. यंदा पहिल्याच दिवसापासून भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. या रागेंत सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामुळे लालबागच्या राजाच्या या व्हिडिओच्या चर्चेला उधाण आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामान्य भाविकांप्रमाणेच मोठमोठ्या सेलेब्रिटी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येत आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दर्शन घ्यायला लालबागला पोहोचली. पण तिच्यासोबत जी व्यक्ती आली होती त्या व्यक्तीला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी जॅकलिनसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आले होते. ते दोघे 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडिओमध्ये जॅकलिन फर्नांडिस देसी लुकमध्ये दिसून आली. राजाचे दर्शन घेताना तिने तिच्या डोक्यावर ओढणी घेतली होती. याच वेळी पार्थ पवारांनी त्यांच्या खिशातून काही नोटा काढल्या आणि जॅकलिनच्या हातात दिल्या. यानंतर जॅकलिनने त्या नोटा बाप्पााच्या दानपेटीत टाकल्या. यानंतर दोघांनी चरणस्पर्श करत लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं व दोघेही तिथून निघून गेले.
जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवारांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी जॅकलिनच्या साध्या लुकचं कौतुक केलं, तर काहींनी ‘पार्थ यांनी जॅकलिनला पैसे का दिले?’ असा प्रश्न विचारला आहे. या व्हिडिओमुळे जॅकलिन आणि पार्थ पवार यांच्यात काहीतरी नातं आहे की काय, अशी चर्चाही रंगू लागली.