मुंबई ः राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) यंदाही ‘इलेक्ट्रीशियन’ आणि ‘फिटर’ या पारंपरिक कोर्सेसना सर्वाधिक पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप दोन फेर्या शिल्लक असल्यामुळे एकूण प्रवेशसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील 1 हजार 45 खासगी आणि शासकीय आयटीआयमध्ये यंदा एकूण 1 लाख 47 हजार 612 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी तब्बल 1 लाख 97 हजार 138 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तीन फेर्यांत एकूण 81 हजार 115 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यात 66 हजार 805 मुले आणि 14 हजार 310 मुलींचा समावेश आहे. अजूनही चौथी प्रवेशफेरी व समुपदेशन फेरी बाकी आहे.
राज्यातील खासगी आणि सरकारी अशा मिळून 1 हजार 45 आयटीआय संस्था आहेत. या आयटीआयमध्ये 116 प्रकारच्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यात अभियांत्रिकी विषयाचे एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम, दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम, बिगर अभियांत्रिकी विषयाचे एक वर्षाचे अभ्यासक्रम आहेत. यंदा इलेक्ट्रिशियन व फिटरपाठोपाठ ‘वेल्डर’ अभ्यासक्रमाला 16 हजार 820 जागांपैकी केवळ 8 हजार 168 प्रवेश घेतले आहेत. संगणक शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, ‘कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट’या कोर्सला यंदा 7 हजार 608 जागांवर 5 हजार 412 प्रवेश घेतले आहेत.
‘मेकॅनिक डिझेल’ 7 हजार 80 जागांवर 4 हजार 679 ‘वायरमन’ या कोर्सला 6 हजार 192 पैकी 4 हजार 353 प्रवेश झाले आहे. ‘मेकॅनिक मोटर व्हेईकल’ला 56.66 टक्के प्रवेश झाले असून 4 हजार 400 जागांवर 4 हजार 353 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुलींसाठी असलेल्या ड्रेस मेकिंग, शिवण तंत्रज्ञान आणि कॉस्मेटॉलॉजी या कोर्सेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे कोर्सेस मुलींसाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरत असल्याने मागणी वाढताना दिसत आहे.